माऊली क्रिटिकल केअर च्या वतीने पाथर्डी तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान
By Admin
माऊली क्रिटिकल केअर च्या वतीने पाथर्डी तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान
पाथर्डी- प्रतिनिधी
संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व डॉक्टरांनी तयार असले पाहिजे. तिसरी लाट येऊ नये, यासाठी डॉक्टरांनी नागरिकांना लसीकरणासाठी तसेच मास्कचा वापर व कोव्हिड नियमांचे पालन करण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे.कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी मास्कचा वापर व लसीकरण हे सोपे उपाय असुन, ग्रामीण भागातील नागरिकांना प्रबोधन करून यासाठी प्रवृत्त करावे, असे प्रतिपादन अहमदनगर येथील माऊली क्रिटिकल सेंटरचे संचालक डॉ. संतोष गिते यांनी केले.
अहमदनगर येथील माऊली क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील डॉक्टरांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डाॅ .गिते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे होते. या वेळी माजी नगरसेवक डाॅ. दीपक देशमुख , डॉ. शिरीष जोशी , डॉ. सुहास उरणकर, डाॅ. वर्षा गिते ,डाॅ. अंबिका वाघ, डाॅ .वैशाली गर्जे, डाॅ. प्रज्ञा शिरसाट, खरवंडी कासार येथील डाॅ. हुद्देदार ,डाॅ . सुभाष देशमुख , डाॅ. अमोल जाधवर, डॉ. विलास बाहेती, डॉ. अभय भंडारी आदींसह शहर तालुक्यातील डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ. गिते म्हणाले, सर्वत्र थैमान घालणा-या कोरोना विषाणूपासून नागरीकांना दूर ठेवणे, दुर्देवाने कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा करून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी डॉक्टरांनी अहोरात्र झटून आपल्या सामाजिक दातृत्वाच्या भावनेचे दर्शन घडविले आहे. कोरोना आजार तसा संपूर्ण जगासाठी नवीनच असल्याने सुरवातीला त्याच्यावर ठोस उपाय नव्हता. नवनवीन अनुभवातून औषधोपचार करून कोरोनाला आटोक्यात आणणे डॉक्टरांसाठी मोठे दिव्य होते. अशाही परिस्थितीत डॉक्टरांनी हार न मानता रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे राहून रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना खचू न देण्याचे मोठे काम केले आहे. आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांची कामगीरी देवदुतापेक्षा नक्कीच कमी नसल्याचे गौरवोद्गारही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ . सुजित मोटे, सूत्रसंचालन डॉ. शिरीष जोशी तर आभार डाॅ. तुकाराम गिते यांनी मानले.

