महाराष्ट्र
चालकाला लुटणारे तीन जणांना पोलिसांनी केले जेरबंद
By Admin
चालकाला लुटणारे तीन जणांना पोलिसांनी केले जेरबंद
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी-नगर रस्त्यावरील निवडुंगे शिवारात प्रवासी असल्याचा बनाव करीत चालकाला लुटणार्या तिघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने मुसक्या आवळल्या.
स्वप्नील शंकर सोनटक्के (वय 23), भोला ऊर्फ टिकली ऊर्फ ओमकार सुनील शिंदे (वय 21) नारायण रमेश खुपसे (वय 19 दोघे रा. प्रसावतनगर, जि. परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. 12 जानेवारीला फिर्यादी शिवाजी अभिमन्यू वाघमारे (वय 40, रा. रत्नापूर, ता. कंळब, जि. उस्मानाबाद हल्ली रा. कोंढवा, जि. पुणे) हे रिलायन्स डिजीटल, पिंपरी, पुणे येथे नोकरीस असून सुट्टीच्या दिवशी प्रवास भाडे करतात. 12 जानेवारीला ते पुणे ते औरंगाबाद असे प्रवासी भाडे घेऊन औरंगाबादला आले. रात्री औरंगाबाद येथून चिंचवडला जाण्यासाठी निघाले.
औरंगाबाद येथून त्याच्या कारमध्ये तीन जण बसले. कार पांढरीपूल येथे आल्यावर नातेवाईकाला फोन लावला व चालकाला सांगितले की निवडुंगे येथून आमचे आत्याला घेऊन परत पुणे येथे जायचे आहे. चालकाने कार निवडुंगे येथे घेतली. निवडुंगे येथे गेल्यानंतर कार रस्त्यावर थांबवली. त्यातील एकाने शिव्या दिल्याच्या कारणाने मारहण करण्यास सुरूवात केली. चाकून वार करून जखमी केले. 6 लाख 51 हजार रुपये किमतीची वॅगनआर कार, दोन मोबाईल, घड्याळ, रोख रक्कम व कागदपत्रे जबरीने चोरुन नेली. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निवडुंगे येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. या गुन्ह्यातील आरोपी प्रसावतनगर परभणी येथे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने प्रसावतनगर येथे जावून स्वप्नील शंकर सोनटक्के याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर त्या दोघांना त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांना पुढील तपासाकामी पाथर्डी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक दिनकर मुंडे, सहायक फौजदार मनोहर शेजवळ, राजेंद्र वाघ, बाळासाहेब वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, शंकर चौधरी, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, भीमराज खर्से, दीपक शिंदे, रवींद्र घुंगासे, सागर ससाणे यांच्या पथकाने केली.
Tags :
527073
10