कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचे आदेश
नगर सिटीझन रिपोर्ट live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात काेरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. नागरिकांकडून कोविड नियमांचे पालन केले जात नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून अधिक कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याची सुरूवात रविवारपासून झाली आहे.
नगरमध्ये रविवारी ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी विनामास्क असलेल्यांवर कारवाई केली.
जिल्ह्यात आठ दिवसांपासून करोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. यापूर्वी दररोज चारशे ते पाचशे रूग्ण आढळून येत होते. यात वाढ होऊन ते एक हजाराच्यापुढे गेले आहेत. यामुळे तिसर्या लाटेची भिती निर्माण झाली आहे. तरीही काही बेजबाबदार नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे चिंचेत भर पडली आहे.
कोविड काळात मास्क लावणे, शारिरीक अंतर ठेवणे, विवाह व इतर समारंभात गर्दी न करणे अशी नियमावली प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, नागरिकांकडून नियम पाळले जात नाही व प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. बहुतांश ठिकाणी गर्दी सुद्धा पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे, तर काही जण नियमच पाळत नाही, अशीच उदाहरणे पाहायला मिळत आहेत. या अगोदर सुद्धा पोलीस प्रशासनाने कोट्यावधी रुपयांचा दंड वसूल केलेला आहे, एवढे होऊन देखील सुद्धा नियमांचे उल्लंघन होत आहे. तसे आदेश अधीक्षक पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत.