ई टपाल संगणकीय प्रणालीमुळे १.७५ लाख प्रकरणे निकाली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलात ई- टपाल कार्यप्रणाली यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ई-टपाल प्रणालीमुळे पोलीस प्रशासनाचे कामकाज अधिक पारदर्शक व कार्यक्षम झाले असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस दलात फेंब्रवारी 2021 पासून ई-टपाल ही संगणकीय कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे पोलीस दलामध्ये केले जाणारी टपालाची देवाण-घेवाण ऑनलाईन पद्धतीने जलदगतीने झाली आहे. या प्रणालीमुळे १.७५ लाख प्रकरणे निकाली निघाली. नवीन आलेले, प्रलिबंत, प्रक्रियेत असलेली व कार्यवाही पूर्ण झालेले टपाल यावर नियंत्रण ठेवता येते. तसेच नागरिकांनी केलेल्या अर्जावर विहित मुदतीत तात्काळ सेवा देता येत असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. सदर ई-टपाल प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाखा व पोलीस ठाण्याच्या संबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना युजर आयडी दिला असून त्यांना टपाल प्राप्त झाल्यास त्यांच्याकडून त्या टपालावर कार्यवाही केली जाते. ज्या टपालावर कार्यवाही केली नाही, असे टपाल प्रलंबित दिसतात. या प्रणालीमुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरिकांना याचा फायदा झाला असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.