मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी विक्रेत्यांकडून पुजेचे साहित्य फेकल्याने महीलेला जखम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी नारळ व पूजेचे साहित्य विक्रेत्यांकडून भाविकांच्या वाहनांवर फेकल्याने एक महिला जखमी झाली.
भाविकांच्या खिशातील पैसे बळजबरीने काढून घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी सिंधुबाई रोहिदास डमाळे या महिलेला अटक केली आहे. अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (सोनेवाडी, पो. मेहकरी, ता. नगर) येथील सुधीर वायकर सहकुटुंब चारचाकी वाहनातून (एमएच 16-1877) मोहटा देवी गडावर दर्शनासाठी आले होते. सुधीर गाडी चालवत होते. त्यांच्या पत्नी स्वाती शेजारच्या सीटवर बसल्या होत्या.
सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांची गाडी गडाच्या पायथ्याजवळ आली. तेव्हा पूजेचे साहित्य विकणार्या महिलेने नारळ व पूजेचे साहित्य असलेली पिशवी गाडीच्या दिशेने फेकली. नारळाच्या फटक्याने काच फुटली. त्याच वेळी दुसर्या महिलेने पूजा साहित्याची पिशवी गाडीत फेकली. त्यातील नारळाने स्वाती यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. वायकर यांनी पिशव्या का फेकता, माझ्या पत्नीच्या डोळ्याला इजा झाली. आम्हाला पूजा साहित्य नकोय, असे सांगितले. त्यावर गुपचूप दोनशे रुपये दे, असे म्हणत दुकानदार महिलांनी वायकर यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या खिशातील तीनशे रुपये काढले. सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून वायकर यांना सोडवले. स्वाती यांच्या तक्रारीवरून सिंधुबाई रोहिदास डमाळे व बाळाबाई भानुदास शिरसाठ (दोघी रा. मोहटादेवी गड) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.
भाविकांना स्थानिक व्यावसायिकांकडून अशी वागणूक मिळणार असेल, तर पोलिस कठोर कारवाई करतील. जबरदस्तीने नारळ फेकणार्यांवर पोलिस प्रशासन यापुढे जबरी चोरीचे गुन्हे दाखल करतील.
– प्रवीण पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक.