बाबुजी आव्हाड महाविद्यालयास विज्ञान विद्याशाखा सुरु करण्यास मान्यता
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रथम वर्ष विज्ञान (एफ. वाय. बी.एस्सी) विद्याशाखा सुरू करण्यास मान्यता दिली असून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी ( एफ वाय बी एस्सी ) प्रवेश दिले जाणार आहेत.
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची स्थापना सन १९६६ साली झाली. तेव्हापासून महाविद्यालयात कला व वाणिज्य विद्याशाखा सुरु असून उच्च विद्याविभूषित प्राध्यापकांच्या अध्यापनाबरोबरच सुसज्ज व संपूर्ण संगणकीकृत ग्रंथालय, मोफत करियर अकॅडमी, अत्याधुनिक कॉम्पुटर लेब, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, याबरोबरच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविणारे इनडोअर स्टेडियम, पोलीस व आर्मी भारती तयारीसाठी उपयुक्त जिल्ह्यातील एकमेव ४०० मी. रनिंग ट्रेक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम आदी सुविधा महाविद्यालयात असून संपूर्ण परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. शैक्षणिक सुविधांबरोबरच महाविद्यालयात एन. सी. सी., राष्ट्रीय सेवा योजना आदी विभाग चालविले जातात.
नुकतीच वाणिज्य विद्याशाखेच्या रिसर्च सेंटरला विद्यापीठाने मान्यता दिली आहे. या विज्ञान विद्याशाखेस मान्यता मिळाल्याबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षासाठी (एफ. वाय. बी एस्सी) त्वरित प्रवेश घ्यावेत, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी केले.