महाराष्ट्र
436
10
दादापाटील राजळे हे चालते बोलते लोकपीठ होते प्राचार्य यशवंत पाटणे
By Admin
दादापाटील राजळे हे चालते बोलते लोकपीठ होते.- प्राचार्य यशवंत पाटणे
पाथर्डी- प्रतिनिधी
दादापाटील राजळे महाविद्यालयात स्व. दादापाटील राजळे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त दादापाटील राजळे स्मृती व्याख्यानमालीचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक, साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे सातारा, यांच्या शुभहस्ते झाले. 'जीवन त्यांना कळले हो' या विषयावरील व्याख्यानात त्यांनी स्व. दादापाटील राजळे स्मृती व्याख्यानमाला ही एक कर्मयोगाच्या विचारांचा उत्सव आहे. माणसांना जिवंत राहण्यासाठी अन्न लागते पण सन्मानाने आणि समाधानाने जगण्यासाठी विचारांची गरज असते मानवी जीवनाची सार्थकता ही आयुष्यभर जपलेल्या विचार मूल्यांवर अवलंबून असते. सामान्य माणूस आणि लोकशाही मूल्ये हाच दादापाटील राजळे यांच्या विकासकार्याचा केंद्रबिंदू होता. सामाजिक न्यायासाठी लढणे हा त्यांचा पिंड होता आणि सत्कर्म हा त्यांचा स्थायीभाव होता. दादापाटील राजळे यांचे जीवन ही संघर्ष गाथा आहे. जीवन जगत असतांना माणसे स्वतःसाठी घर बांधतात परंतु जनसामान्य माणसांच्या मनात घर बांधता आले पाहिजे. स्वर्गीय भाऊंचे नेतृत्व हे दूरदृष्टीचे नेतृत्व होते. त्यांनी मानवनिर्मित अज्ञानाचा आणि दारिद्र्याचा अंधकार दूर करण्यासाठी श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आणि ज्ञानमंदिराची उभारणी केली. एवढेच नव्हे तर कमी शिक्षण असूनही त्यांनी गावात वाचनालय सुरू केले. आजच्या युवा पिढीत अतिरेकी चंगळवाद वाढत चाललेला आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबरच ग्रामीण शहाणपण माणसात येणे गरजेचे आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा स्वर्गीय भाऊंनी पुढे चालवला. माणसाला मृत्यू असतो परंतु माणसाचे कार्य अमर असे असते. ज्ञान मिळवण्यासाठी कान व डोळे ही ज्ञानेंद्रिय महत्त्वाची असतात. माणसाने निसर्गात, ग्रंथात व माणसात रमलं पाहिजे. एका रात्रीतून संस्कृती निर्माण होत नाही. असे विचार प्राचार्य यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले. त्यांनी स्व. दादापाटील राजळे स्मृती व्याख्यानमालेचा आढावा घेऊन प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान आ. मोनिकाताई राजीव राजळे यांनी भूषवले आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी व्याख्यानमालेच्या आयोजना संदर्भात सर्वांचे अभिनंदन केले व सर्व विद्यार्थ्यांना या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
व्याख्यानमालेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष रामकिसन पा.काकडे, ज्येष्ठ संचालक म उद्धवराव पा.वाघ, मा. राहूल राजळे श्री.कुशिनाथ बर्डे, श्री. सुभाषराव ताठे, मा. पांडुरंग कसोटे सर, मा. रामदास म्हस्के, मा. एकनाथ लवांडे, श्री. श्रीकांत मिसाळ, मा. जे. आर. पवार, मा. आर. जे. महाजन, मा. बी. आर. गोरे, मा. मिर्झा मणियार, मा.काकासाहेब शिंदे, सुनील ओव्हाळ, अनिल बोरुडे, सुनील पुंड, , मा. बाळासाहेब अकोलकर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
Tags :

