महाराष्ट्र
रस्तालूट करणारे सराईत दोघे जेरबंद
By Admin
रस्तालूट करणारे सराईत दोघे जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर-औरंगाबाद महामार्गावर रस्तालूट करणार्या पाच जणांपैकी दोघांना नेवासा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप गाडीसह पकडले. पाच जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ऋतिक संजय जाधव व दीपक बाळासाहेब काळे (दोघे रा. देहरे, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांच्यासह पोलिस कर्मचारी नगर-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी माळीचिंचोरा फाट्याजवळ नादुरुस्त झालेली ट्रक (क्र. एमएच 6 एवाय 7254) उभी होती. त्यास पोलिसांनीच काही अडचण आल्यास एका हवालदाराचा मोबाईल नंबर देऊन कळविण्यास सांगितले होते.
पहाटे 3.30 च्या दरम्यान या ट्रकचालकाला पिकअप (क्र.एम.एच.20 डी. ई. 2337) गाडीतून आलेल्या पाच जणांनी कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील 8 हजार रुपये घेऊन पसार झाले. हा झालेला प्रकार ट्रकचालकाने तातडीने नेवासा पोलिसांना कळविला. त्यानंतर पोलिस निरीक्षक विजय करे, कर्मचारी बबन तमनर, अंबादास गिते, नारायण डमाळे, दिलीप कुर्हाडे हे घटनास्थळी माळीचिंचोरा फाट्यावर आले.
त्यांनी ट्रकचालकाला बरोबर घेऊन नगर-औरंगाबाद महामार्गावर तपास सुरू केला असता लुटारूंची पिकअप गाडी नेवासा फाट्यावर उभी असलेली दिसली. त्यात ज्या चोरट्यांनी पैसे घेतले तेही होते. पोलिसांना बघताच पाचपैकी तिघे जण अंधारात पळून गेले. दोघांनी पिकअप गाडीसह पलायन केले. पोलिसांनी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दत्तात्रय गव्हाणे व ज्ञानेश्वर शिंदे यांनाही कल्पना दिली. पोलिस निरीक्षक विजय करे व सहकार्यांनी महामार्गावर सुमारे 40 ते 50 किलोमीटर चोरट्यांचा पाठलाग केला.
अखेर नेवासा फाट्यावरील एका शोरूमसमोर या दोघा चोरट्यांना गाडीसह पकडले. पोलिसांनी कोयता व दोन मोबाईल जप्त केला आहे. ऋतिक जाधव व दीपक काळे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करीत आहेत.
अन् चोरट्यांनी त्यालाच लुटले!
नेवासा पोलिसांनी नादुरुस्त झालेल्या ट्रकचालकाला काही अडचण, मदत लागली, तर कळविण्यास सांगितले होते. या ट्रकचालकालाच चोरट्यांनी लक्ष्य बनवून 8 हजारांची रोकड लांबविली. ट्रकचालकाने पोलिसांना कळविले आणि पाठलाग करून पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे.
Tags :
877
10