पाथर्डी- नगर पालिका निवडणूकीत महीला मतदारांचा कौल राहणार निर्णायक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : आगामी पालिका निवडणुकीत महिला मतदारांची संख्या मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढल्याने, या निवडणुकीत महिला मतदारांचा कौल ज्या पक्षाच्या बाजूने राहील, तो पक्ष पालिकेची सत्ता हस्तगत करणार आहे.
त्यामुळे या निवडणुकीत उतरणाऱ्या प्रमुख पक्षांना महिला मतदारांची मते आपल्या बाजूने खेचण्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार आहे.
मागील पालिका निवडणुकीत केवळ एका प्रभागात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक होती. मात्र, या वेळी होणाऱ्या निवडणुकीत दहापैकी चार प्रभागांत महिला मतदार जास्त असल्याने, या प्रभागात महिला ठरवतील तोच उमेदवार निवडून येणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत एकूण मतदारसंख्या १८ हजार ८२५ होती. मात्र, चालू निवडणुकीत ती २५२८ ने वाढून २१ हजार ३५३ झाली आहे. मागील पंचवार्षिकला जे मतदार होते, त्यात महिला मतदारांची संख्या ९११२ होती, ती वर्षी होणाऱ्या निवडणुकीत तब्बल १३८९ मतांनी वाढून १० हजार ५०१ झाली आहे. मागील पंचवार्षिकला प्रभाग २ या एकमेव प्रभागात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक होती. मात्र, चालू वर्षीच्या निवडणुकीत प्रभाग पाच, सहा, सात व आठमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या वाढल्याने तेथे महिला मतदारांची मते जो उमेदवार अधिक घेईल, त्याला विजयाची अधिक संधी आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने, यावेळी होणाऱ्या निवडणुकीत वीसपैकी दहा महिला नगरसेविका होणार आहेत. या निवडणुकीत महिला मतदारांचा प्रभाव अधिक राहणार असल्याने प्रत्येक पक्ष किंवा आघाडीला सक्षम महिलांना उमेदवारी देण्याचे मोठे आव्हान असणार आहे.