महाराष्ट्र
951
10
पेट्रोलपंपाच्या टाकीतून चोरट्यांनी 2300 लिटर डिझेल चोरले;चोरट्यांचा नवीन धडाका
By Admin
पेट्रोलपंपाच्या टाकीतून चोरट्यांनी 2300 लिटर डिझेल चोरले;चोरट्यांचा नवीन धडाका
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर तालुक्यातील जेऊर येथील पेट्रोल पंपावरून तब्बल 2300 लिटर डिझेलची चोरी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि.9) पहाटेच्या सुमारास घडली.
चोरट्यांनी नवा फंडा वापरत चक्क पेट्रोलपंपाच्या टाकीतून हे डिझेल लांबविले आहे.
नगर औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात सागर कन्स्ट्रक्शनचा भारत पेट्रोलपंप आहे.
पंपावरील कर्मचारी झोपल्यानंतर चोरांनी डिझेलच्या टाकीवरील विटाचे बांधकाम तोडून, झाकणाचा पाईप तोडून इलेक्ट्रिक मोटारच्या साहाय्याने टाकीतून तब्बल 2300 लिटर डिझेल चोरून नेले. या पेट्रोलपंपावर दोन महिन्यापासून पेट्रोल व डिझेल शिल्लक नव्हते. शुक्रवारी (दि.8) रात्री पेट्रोल व डिझेलचा टँकर खाली करण्यात आला होता.
डिझेलचा टँकर खाली झाल्यानंतर सीएनजी गॅसपाईप लाईनच्या कामामुळे झालेल्या गाळात सदर टँकर फसला होता. टँकर बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर लावून प्रयत्न करण्यात आला. परंतु, तो प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर रात्री दीडच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने टँकर बाहेर काढण्यात आला.
त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचारी सचिन पवार व अमोल नागरगोजे झोपी गेले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास 2300 लिटर डिझेलची चोरी झाली असून, त्याची किंमत 2 लाख 20 हजार रुपये एवढी होत असल्याची माहिती पंपाचे व्यवस्थापक सतीश गिते यांनी दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे रमेश थोरवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नगर औरंगाबाद महामार्गावर डिझेल चोरांनी धुमाकूळ घातला असून हॉटेल, पंपावर थांबलेल्या गाड्यांमधून यापूर्वी डिझेल चोरी होत होती. परंतु, आता चोरट्यांनी नवीन फंडा सुरू केल्याचे दिसून येत आहे. चक्क पंपाच्या डिझेल टाकीतून डिझेल चोरी गेल्याने पंप चालकांचेही धाबे दणाणले आहेत.
डिझेल चोर, रस्तालूट टोळ्या सक्रिय
नगर-औरंगाबाद महामार्ग तसेच नगर-मनमाड महामार्ग परिसरात डिझेल चोर व रस्ता लूट करणार्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी डिझेल चोरांनी नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय करे व त्यांच्या पथकावर गाडी घालून जखमी केले होते. त्या डिझेल चोरांना एलसीबी व नेवासा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले आहे. तरीही मोठ्या प्रमाणात डिझेल चोरीच्या घटना घडत आहेत.
गस्तीसाठी आता तरुणांचे पथक
डिझेल चोर, रस्ता लूट, भुरट्या चोर्या रोखण्यासाठी तरुणांच्या पथकाने रात्री महामार्गावर गस्त घालण्याचा निर्णय जेऊरच्या तरुणांनी घेतला आहे. त्यासाठी पोलिसांकडे सहकार्याची मागणी करण्यात येत आहे. ग्रामसुरक्षा दलाप्रमाणेच या पथकात तरूण आळीपाळीने लक्ष देतील, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)