फ्ल्यू सदृश्य लक्षणे असणाऱ्याची होणार आरटीपीसीआर टेस्ट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 12 मे 2021 मंगळवार
जिल्ह्यातील फ्ल्यू सदृश्य लक्षणे असणाऱ्या तसेच एक्स-रे आणि एचआरसीटीमध्ये लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयांच्या सर्व वैद्यकीय अधीक्षक यांना दिले आहेत. याशिवाय, डॉक्टरांच्या प्रीस्क्रीप्शनशिवाय मेडीकल स्टोअर्समधून कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनाची औषधे देऊ नयेत, असे निर्देश सर्व मेडीकल स्टोअर्सना बजावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी हे निर्देश संबंधितांना दिले आहेत.
जिल्ह्यात काही मेडिकल स्टोअर्सवरुन कोरोना बाधित रुग्णांना डॉक्टरांच्या प्रीस्क्रीप्शनशिवाय कोरोनाची औषधे देत असल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आता सर्व मेडीकल स्टोअर्सना आता कोरोना बाधित रुग्णांना डॉक्टरांच्या प्रीस्क्रीप्शनशिवाय औषधे देण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच मेडिकल स्टोअरवरुन औषध वितरित करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची यादी संबंधित कार्यक्षेत्रातील तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक यांना सादर करण्याबाबत बजावले आहे. यात औषधे वितरित करण्यात आलेल्या रुग्णाचे नाव, संपूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
फ्लू सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आणि चाचणीत बाधित आढळून आलेल्या व्यक्तींचे तात्काळ संस्थात्मक विलगीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, कार्यक्षेत्रातील सर्व रोगनिदान केंद्रात चेस्ट एक्स रे तसेच एचआरसीटी मध्ये लक्षणे दिसून आलेल्या सर्व रुग्णांची दैनंदिन माहितीही संकलित करुन संबंधितांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.