'या' तालुक्यात आरोग्य सेवेची कोणतीही अडचण येणार नाही.सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध - तहसिलदार यांचा दावा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 20 मे,2021,गुरुवार
शेवगाव: 'तालुक्यातील कोरोना रुग्णांना तीन महिन्यापूर्वी बेड मिळत नसल्याने नगर किंवा इतर शहरामध्ये उपचार घेण्यासाठी जावे लागत होते. मात्र आता तालुक्यात शासकीय व खाजगी अशा १३ कोविड सेंटरमध्ये एक हजार रुग्ण उपचार घेवू शकतात. त्यामुळे कोरोनाच्या येणा-या तिस-या लाटेमध्ये आपण सर्व सुविधा उपलब्ध केल्याने आपल्याला कुठल्याच अडचणी येणार नाहीत,' असे प्रतिपादन तहसीलदार अर्चना भाकड- पागिरे यांनी केले.
शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे बाळासाहेब मुरदारे, नाशिकचे डॉ. महेंद्र नाकील, इंजिनिअरींग मित्र मंडळ पुणे व साईपुष्प कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. प्रल्हाद पाटील यांनी प्रत्येकी एक लाख खर्च करून सुरु केलेल्या सेंट्रल ऑक्सिजन लाईनचा शुभारंभ भाकड यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक रामेश्वर काटे, डॉ.दिपक परदेशी, प्रा.किसन माने, माजी प्राचार्य दिलीप फलके, बाळासाहेब मुरदारे, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, सुनिल रासने, एकनाथ कुसळकर आदी उपस्थित होते. तहसीलदार भाकड म्हणाल्या, 'कोरोना संसर्गामुळे गेल्या तीन महिन्यात १०० च्या पुढे रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये तरुणांचे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंतेची बाब निर्माण झाली होती. त्यामुळे एक महिनाभर सर्व उपाययोजना राबवण्याचे धोरण आखले. त्यामध्ये सर्व लोकप्रतिनीधी,डॉक्टर, नागरिकांनी खुप मोलाची मदत केली. या काळात तालुक्यात सर्व आरोग्य सुविधा निर्माण करण्यात यश आले.