भाजप नेते दुष्काळी भागातील जनतेच्या भावनांशी खेळले - अॕड. प्रताप ढाकणे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : भगवानगड पाणीयोजना आपण मंजूर केली, असे सांगत, दुष्काळी भागातील जनतेच्या भावनांशी खेळ खेळण्याचे पाप केले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे आमदार माेनिका राजळे आणि भाजप नेत्यांचा नामाेल्लेख टाळून केली. महाविकास आघाडी सरकारने या योजनेला मान्यता दिली, असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
ढाकणे यांनी म्हटले आहे, भगवानगडसह ४६ गावांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेच्या स्थळ पाहणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सुमारे १९० कोटी रुपये खर्चाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या योजनेचे अंदाजपत्रक व आराखडा तयार करण्याचे काम राजस्थानमधील एका कंपनीला देण्यात आले आहे. ही योजना मार्गी लावावी, अशी मागणी आपण टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्यांनी या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. भाजपच्या भूलथापांकडे जनतेने लक्ष देऊ नये. या योजनेचे २०१४ मध्ये जर खरेच काम झाले असते, तर योजना प्रत्यक्षात उतरली असती. मात्र, या मुद्याचे राजकीय भांडवल बनवून निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवण्याचे कटकारस्थान या मंडळींना करायचे होते. पुढील आठवड्यात मुंबई येथे पाणीपुरवठा मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही प्रताप ढाकणे यांनी म्हटले आहे.