सरकारला त्यांचे गांभीर्य नाही; या महीला पदाधिकारीनी केले मत व्यक्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर ‘तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिपद्वारे मांडलेली व्यथा मी ५० वेळा ऐकली. मात्र याकडे सरकारकडून दुर्लक्ष होते का ? तसेच काम करताना आत्महत्याची सुसाईड नोट ठेवून काम करावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. वनविभागाच्या दिपाली चव्हाण सारख्या अनेक महिलांचा बळी या व्यवस्थेत गेला आहे. या महिलेच्या व्यथा ऐकुन किमान या गंभीर विषयावर महसुल मंत्री थोरात बोलतील व काही तरी कारवाई करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी व सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला नाही,’ असा थेट आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
‘महसुल खात्याचे राज्याचे पालकत्व ज्या मंत्र्यांकडे आहे, व जे याच जिल्ह्यातील आहेत, अशा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना एका महिला अधिकाऱ्याची व्यथा ऐकण्यास व त्यावर बोलण्यास वेळ नाही. राज्यातील काही महिला सुसाईड नोट ड्रावरमध्ये ठेऊनच काम करत आहेत, हे राज्याचे दुर्देव आहे. राज्य सरकार शंभर कोटी रूपये गोळा करण्यातच मग्न आहे. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती गेली अनेक दिवसात करता आली नाही,’ अशी टीकाही वाघ यांनी केली. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून ऑडिओक्लीप द्वारे आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती. या प्रकरणात वाघ यांनी पहिल्याच दिवशी आपली प्रतिक्रीया व्यक्त करत नाराज व्यक्त केली होती. त्या आज, मंगळवारी पारनेर येथे तहसीलदार देवरे यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. त्यांनी तहसील कार्यालयात सुमारे एक तास देवरे यांच्या सोबत बंद दाराआडून चर्चा केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.