साखरेचा ट्रक उलटून चालक जागीच ठार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात धोकादायक वळणावर ट्रक उलटून चालकाचा ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना 24 जानेवारीला रात्री साडेअकरा वाजता घडली.
कैलास अशोक उर्फ आश्रुबा जाधव (रा. महारचिकणा, ता. लोणार, जि. बुलढाणा ) असे अपघतात मृत झालेल्या चालकाचे नाव आहे. ट्रकमध्ये असलेल्या समाधान किसन सदावर्ते (रा. महारचिकणा ता. लोणार) यांनी खाली उडी मारल्याने ते बचावले असून, किरकोळ जखमी झाले आहेत.
24 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता चालक कैलास जाधव हा बारा टायर ट्रकमध्ये (क्र. एमएच 40 सीडी 96) जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जयश्रीराम शुगर फॅक्टरीतून साखरेच्या बॅगा घेऊन चिखली (जि. बुलढाणा) येथे जात होता. हा ट्रक पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटातील एका वळणावर ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला. त्यात चालक कैलास जाधव हा वाहनाच्या खाली सापडल्याने जागीच मृत्यूमुखी पडला. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.