छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह | राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी
नाशिक - प्रतिनिधी
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. छगन भुजबळ यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली आहे. दरम्यान, काल शरद पवार यांच्यासोबत भुजबळांनी लग्नाला हजेरी लावली होती.राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती.
'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा', असे ट्विट भुजबळांनी केले आहे.
शिवजयंतीदिनी (19 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खान्देशातील राष्ट्रवादीचे बडे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधीदेखील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.