महाराष्ट्र
तिसगावमध्ये अवैध सावकारकीला आले उधाण
By Admin
तिसगावमध्ये अवैध सावकारकीला आले उधाण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगावमध्ये अवैध सावकारकीला चांगलेच उधाण आले आहे. त्यामध्ये अनेकजण भरडले जात असून, खासगी सावकाराच्या तगाद्यामुळे आत्महत्यांचे प्रकार वाढले आहेत.
एका तरुणाने पंधरा दिवसांपूर्वी केलेला आत्महत्येचा प्रयत्न व त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीमुळे चर्चेला उधाण आले आहे. या अवैध सावकारकीमध्ये तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात अडकताना दिसत आहे. हात उसने घेतलेले संपूर्ण पैसे परत करूनही समोरच्यांकडून पैशाचा तगादा सुरूच राहिल्याने, एका तरूणाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पंधरा दिवसापूर्वी घडली.
यामध्ये संबंधित तरुणाने तिसगाव येथील एका सराफासह आठ ते नऊ लोकांविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. तिसगाव येथील मुजफ्फर हनिफ शेख या तरुणाच्या घरी काही लोक पैशाचा तगादा करण्यासाठी गेले. यावेळी शेख यांच्या तक्रारीवरून संबंधितांनी चाकूचा व बंदुकीचा धाक दाखवित मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकाराला वैतागून शेख याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास तात्काळ शेवगाव व नंतर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने, त्याचा जीव वाचला.
घटनेनंतर शेख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिसगाव येथे आपली स्वमालकीची जागा असून, त्या जागेवर इमारत बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामासाठी हात उसने पैसे घेतले. ते पैसे संबंधितांना परतही केले. परंतु, संबंधितांचा डोळा आपल्या जागेवर व इमारतीवर असल्याने, त्यांनी सातत्याने दमदाटी करून कोणताही मोबदला न देता जागेची खरेदी करून घेतली. तसेच, ते सातत्याने पैशाचा तगादा करत असल्याचे शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.
आणखी 25 लाखांची मागणी
सावकारांस 78 लाख रूपये देऊनही, ते आणखी 25 लाख रुपयांची मागणी करत मानसिक त्रास देत असल्याचे शेख यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये तिसगावमधील एका सराफासह इतरही काही सात-आठ लोकांवर थेट आरोप करण्यात आल्याने तिसगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पाच ते चाळीस टक्के व्याज
तिसगावात उसनवारीच्या नावाखाली अवैध सावकारकी मोठ्या प्रमाणात वाढली असून, पाच टक्क्यापासून चाळीस टक्क्यांपर्यंत व्यवहार केले जात असल्याची चर्चा आहे. या सावकारकीमुळे अनेक तरूणांना आपल्याकडील घर, जागा, जमीन, गाड्या विकण्याची वेळ आली आहे. मात्र, तक्रार करण्यास कोणी पुढे येत नसल्याने पोलिसांनाही कारवाई करणे शक्य होत नाही.
Tags :
435928
10