महाराष्ट्र
पाणी व्यवसाय करणार्या कंपनीची फसवणूक
By Admin
पाणी व्यवसाय करणार्या कंपनीची फसवणूक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बाटलीबंद पाण्याच्या कंपनीच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या खात्यात परस्पर पैसे वर्ग करून सुमारे दोन लाखांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच समोर आली.
याप्रकरणी शुभम बापूसाहेब भगत (रा. कासार पिंपळगाव) यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भगत यांची कासार पिंपळगाव येथे गीतांजली फूड नावाची बाटलीबंद पाणी तयार करण्याची कंपनी आहे. दि. 22 जानेवारी रोजी सायंकाळी भगत यांना कुणाल चौधरी नावाच्या इसमाचा फोन आला.
मै आर्मी डिपार्टमेंट अहमदनगर से बात कर रहा हूं , हमे आर्मी कॅन्टीन मे पानी बॉक्स चाहिये, असे त्यांनी हिंदीतून सांगितले. भाव ठरवून 100 बॉक्स पाठवून देण्याचे सांगितले. दि. 23 जानेवारी रोजी सकाळी पाण्याचे बॉक्स भरलेली गाडी नगर येथे गेली. कॅन्टीनजवळ गेल्यावर चालकाने चौधरी याला फोन लावला. मी गेट पास घेऊन येतो, असे चौधरीने सांगितले. त्यानंतर चौधरीने भगत यांना फोन लावून अकाउंट डिपार्टमेंटमधून तुम्हाला फोन येईल, असे सांगितले. त्यानंतर भगत यांना दुसरा फोन आला व त्याने बँक खाते नंबर देऊन एक रुपया पाठवायचे सांगितले.
भगत यांनी त्या बँक खात्यावर एक रुपया पाठविल्यानंतर दुसर्या खात्यावरून त्यांना दोन रुपये आले. काहीवेळातच पुन्हा फोन आला व आता सात हजार पाचशे रुपये पाठवा म्हणजे गाडीचे चलन बनवले जाईल, काळजी करू नका, ते पैसे तुम्हाला पुन्हा मिळतील, असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून भगत यांनी 7500 पाठवले. मात्र तरीही गाडी आतमध्ये घेतली नाही.
दरम्यान बराच वेळ गेला. याच काळात भगत यांच्या कंपनीच्या बँक खात्यामधून दोन लाख दोन हजार 497 रुपये वेगवेगळ्या खात्यांवर गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर भगत यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेवून कुणाल चौधरी आणि रितेश कुमार (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांचे विरुध्द फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Tags :
218260
10