पाथर्डी- साखर कामगाराला लुटणारे चोवीस तासांत जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान येथील भाजी बाजारतळात अज्ञात तीन चोरट्यांनी एका इसमाला मारहाण करून बळजबरीने खिशातील पैसे व मोबाईल फोन असा पाच हजारांचा ऐवज लांबविला.
ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पाथर्डी पोलिसांनी चोवीस तासांच्या आत दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
यामध्ये तुषार बबन खोर्दे (वय 23, रा. हंडाळवाडी) याला अटक केली असून, मेहेर टेकडी परिसरात राहणार्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहटादेवी साखर कारखाना (मातोरी, ता. शिरूर कासार, जि. बीड) येथे मजुरी कामगार असलेले संजय सौरन सिंग (वय 40, रा. मलेसिया, ता. धनोरा मंडी, जि. ज्योतिबा फुलेनगर, उत्तरप्रदेश) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय सिंग हे पाथर्डी बाजारतळ येथेे हॉटेल शोधत असताना दुचाकीवर आलेल्या तीन तरुणांनी त्यांना हटकले. त्यांनी जेवणासाठी चांगले हॉटेल आहे का? असे विचारले असता, हे तिघे सिंग यांना बाजारतळामध्ये घेऊन गेले. तेथे एकाने सिंग यांच्या गालावर हातातील टणक वस्तू मारून जखमी केले. इतर दोघांनी त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये रोख व मोबाईल बळजबरीने काढून घेऊन दुचाकीवरून पळून गेले. फिर्यादीने दिलेली माहिती व सीसीटीव्हीचा आधार घेत दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन लिमकर, लक्ष्मण पवार, ज्ञानेश्वर रसाळ, संदीप कानडे यांनी ही कारवाई केली.