महाराष्ट्र
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परीसरात खड्डे व घाणीचे साम्राज्य
By Admin
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परीसरात खड्डे व घाणीचे साम्राज्य
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील अंंतर्गत रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. गावालगत गटारीचे पाणी साचल्यामुळे प्रभाग क्रमांक दोन व तीन परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर काकडे यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
अन्यथा उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. बोंद्रे गल्लीतून वाहनचालकांना जीवमुठीत धरून चालावे लागत आहे. पायी चालणार्यांना पाण्यात रस्ता शोधावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती आहे. बोंद्रे गल्लीपासून जाणारा पुढील रस्ता हरिजन वस्ती अंगणवाडीपर्यंत अतिशय खराब झाला आहे.
खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन धारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तसेच रस्त्यावर पावसात वाहुन आलेले काडी कचरा,प्लास्टीक,नासके अन्न यामुळे शिवाजी बोंद्रे यांच्या घराजवळ दुर्गंधी सुटली आहे. तसेच, पिण्याच्या पाईपलाईनमध्ये हेच सांडपाणी जात असल्याने, ग्रामस्थांना जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरु झाला आहे. दलितवस्ती, आदिवासी कुटुंबासाठी शासनाकडून आलेला लाखो रुपयांचा निधी नेमका जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायतीकडे लाखो रुपये निधी पडून असूनही, ही कामे का होत नाहीत, ही संशोधनाची बाब आहे. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ मारुती मंदिराच्या मागील बाजूस उघडी गटार आहे. शनिवारी त्याठिकाणी आठवडे बाजार भरतो. त्या गटारीच्या सांडपाण्याची दुर्गंधी बाजार परिसरात सुटली आहे. त्याची विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी मुरलीधर काकडे यांनी ग्रामसेवक दिलीप मिसाळ यांच्या निवेदनाद्वारे केली आहे. या मागण्यांची पूर्तता आठ दिवसांत न केल्यास ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य अभिजीत देशमुख, जितेंद्र काकडे, हरिभाऊ देशमुख यांच्याही सह्या आहेत.
Tags :
224
10