परमीट दुकानदाराच्या 'उद्योगा'चा भांडाफोड; 15 लाखाचा बनावट दारू साठा जप्त, दोघांना अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बनावट दारूसाठ्यासह व्हिस्कीच्या भरलेल्या व रिकाम्या बाटल्या आणि बनावट बूच असा 14 लाख 29 हजाराचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून जप्त केला.
या प्रकरणी चैतन्य सुभाष मंड लिक,आणि सुरेश मनोज कालडा (संगमनेर) या मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी गजाआड केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या दिवशी सोमवारी भल्या पहाटे संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथे उघडकीस आली आहे. चैतन्य मंडलिक याच्याघरात हा बनावट दारूचा व्यवसाय सुरु होता. ही दारू संगमनेर-अकोले तालुक्यात विक्री केली जात होती. कालडा याचे दोन्ही तालुक्यात परमिटची दुकाने आहेत. अकोलेतील त्याचे दुकान वादग्रस्त ठरले आहे अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधिक्षकगणेश पाटील, उपअधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्ग दर्शनाखाली संगमनेरचे निरीक्षक आर. डी. वाजे, टिळकनगरचे निरीक्षक अनिल पाटील, दुय्यम निरीक्षक एम. डी. कोंडे, एस. जी. सूर्यवंशी, एस. आर. वाघ, सहायक दुय्यम निरीक्षक बी. ई. भोर, एस. आर. गुंड, एस. के. बटुळे, महिला जवान एस. आर. वराट या पथकाने छापा टाकून कारवाई केली. गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात बंदी असलेल्या 687 सीलबंद बाटल्या, 7500 बनावट बाटल्यांचे बूच व हुंदाई कार असा एकूण 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त केला. चैतन्य मंडलिक व सुरेश कालडा याला मंगळवारी(ता. 16 ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कसून तपास सुरु आहे.