आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत नेत्रदीपक यश
पाथर्डी प्रतिनिधी:
छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय क्रीडा संकुल, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युथ, ज्युनियर व सिनियर वयोगटाच्या पुरुषांच्या अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना नेत्रदीपक यश संपादन केले.
या स्पर्धेत सिनियर गटात संजय लोखंडे याने ६७ किलो वजन गटात १२१किलो स्नॅच व १४० किलो क्लीन अँड जर्क असे २६१ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले तर गौरव डोईजड याने १०९ किलो वजन गटात १२६ किलो स्नॅच व १५०किलो क्लीन अँड जर्क असे २७६ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले.
या यशाबद्दल पाथर्डी तालुका वेटलिफ्टिंग असोसिएशनचे व पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बबन चौरे, अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रा. संजय धोपावकर, रवींद्र सांगळे यांनी अभिनंदन केले.
त्यांना जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले.