पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मुकुंद गर्जेची लेखी तक्रार
दोषी असलेल्या संबंधितावर कारवाई करण्याची मागणी
पाथर्डी प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या नगरपरिषदांचा प्रभाग कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पाथर्डी परिषदेने निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाचा फज्जा उडवला असून गोपनीयतेचा भंग करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी विरोधात कारवाई करण्याची मागणी पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली असून यावर मुख्याधिकारी काय निर्णय घेतात, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गर्जे यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या नगरपरिषदांचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम ०२ मार्च पासुन जाहीर केला आहे. परंतु आपल्या पाथर्डी नगरपरिषदेने निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमां अगोदरच प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने मर्जीतील माजी पदाधिकारी किंवा मर्जीतील संबंधितांना, ठेकेदारांना देऊन राज्य निवडणूक आयोगाच्या प्रभाग रचनेचा फज्जा उडवलेला आहे. त्यामुळे प्रभाग रचना कार्यक्रम सुरु होण्याअगोदरच संपूर्ण पाथर्डी शहरात राजरोस पणे खुलेआम याची चर्चा सुरू आहे. मला पण प्रभाग रचनेचा कागद मिळाला तो मी आपल्याला व्हाट्सअप या सोशल मीडियाद्वारे लगेच पाठवला होता, तरी या निवेदनासोबत मी तो प्रभाग रचनेशी संबंधित मिळालेल्या माहितीचा कागद जोडत आहे. तरी निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करून अगोदरच प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने पाथर्डी शहरातील जनतेत प्रसारित झाले आहे. तरी यामध्ये दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी व जो माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचा राज्य निवडणूक आयोगावर विश्वास आहे, तो कायम टिकवावा, अशी लेखी विनंती मुकुंद गर्जे यांनी केली.