नि:स्वार्थ युथ फाऊंडेशनच्या युवक जिल्हाध्यक्षपदी गोकुळ आंधळे यांची निवड
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील लांडकवाडी येथील सुपुत्र समाजभूषण पुरस्कार विजेते व्याख्याते गोकुळ बबन आंधळे यांची नि:स्वार्थ युथ फाऊंडेशनच्या अहमदनगर युवक जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. संस्थापक तथा अध्यक्ष अथर्व पकाले यांचे कडून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
निःस्वार्थ युथ फाऊंडेशन हे महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच राजकीय चळवळीचे मुक्त व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. नि:स्वार्थ युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अथर्व पकाले यांनी अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी गोकुळ आंधळे यांच्यावर सोपवलेली आहे.
आंधळे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. गोकुळ आंधळे यांनी कोविडच्या कालखंडामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. मोफत भाजीपाला वाटप, पाथर्डी तालुक्यामध्ये कोविड सेंटरला पाणी बॉक्स वाटप, 'दत्तक झाड करूया वाढवूया' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ५०० झाडं वाटप तर ५०० झाडांची लागवड, कोविडच्या कालखंडामध्ये डॉक्टर्स, नर्स व पोलीस प्रशासन यांचा सन्मान केला. असे अनेक सामाजिक कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहे.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन नि:स्वार्थ युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष पदाची धुरा गोकुळ आंधळे यांना देण्यात आली.
गोकुळ आंधळे यांच्या कार्याने नि:स्वार्थ युथ फाउंडेशन हे नाव अहमदनगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाईल, असे प्रतिपादन यावेळी बोलतांना अथर्व पकाले यांनी केले. तसेच गोकुळ आंधळे यांचे अभिनंदन करत येत्या काळात फाउंडेशनचा दबदबा राष्ट्रीय पातळीवर निर्माण करू, असा विश्वासही त्यांनी दर्शविला.
यावेळी नि: स्वार्थ युथ फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.