महाराष्ट्र
17079
10
पाथर्डी पोलिसांची सोशल पोलिसिंग; शाळा, महाविद्यालय प
By Admin
पाथर्डी पोलिसांची सोशल पोलिसिंग; शाळा, महाविद्यालय परिसरातील टवाळखोरांवर कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी पोलिसांनी आपली सोशल पोलिसिंग दाखवत रस्त्यावर उतरून टवाळखोरांवर कारवाईला सुरवात केली आहे. मंगळवारी दुपारी नगर रोड वरील बाबूजी आव्हाड महाविद्यालय, श्री तिलोक जैन विद्यालय, माणिकदौंडी चौक, वसंतदादा विद्यालय, नाईक चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, एम एम निर्हाळी विद्यालय परिसरात पोलिसांनी धुमस्टाईल गाडीवर फिरणार्या टवाळखोर तरुणांवर ही कारवाई केली
पाथर्डी शहरात व तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखताना कायद्याचे उल्लंघन करणार्या व्यक्तींना कायद्याचा धाक दाखवण्याची गरज होती. त्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम मंगळवारपासून सुरू केले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होणारे हातगाडे, दुचाकी व चारचाकी वाहने यांनाही सक्तीच्या सूचना दिल्या आहेत.
पाथर्डी तालुक्यात चोरांच्या आणि इतरही गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होत असताना पाथर्डी पोलिसांनी रस्त्यावर उतरून कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई सुरू केली आहे. यापुढेही कारवाई चालू ठेवण्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. जे गुन्हेगार ज्यांना शहरातून व तालुक्यातून हद्दपार केले आहे ते गुन्हेगार इथेच फिरतात त्यांच्याकडेही पोलिस आता आपला मोर्चा वळवणार आहे.
खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात तालुक्यात सुरू असून अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करणार्या खाजगी सावकारांवरही पोलिसांची नजर आहे. इतरही अवैध धंदे करणार्या लोकांना पोलिस आपला कारवाईचा मोर्चा वळवणार आहे. पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्ह्यांची संख्या वाढली असून त्याचा निपटारा मोठ्या प्रमाणात पोलिसांनी केला आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्याकडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील ,रामेश्वर कायंदे, कौशल्यरामनिरंजन वाघ, उपनिरीक्षक सचिन लिमकर, गुप्तवार्ताचे भगवान सानप यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्यांनी कारवाईला सुरुवात केली.
कारवाईची मोहीम सुरूच राहील : पो.नि. चव्हाण
पाथर्डी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होतात, त्या गुन्ह्यांचा निपटारा मोठ्या प्रमाणात पाथर्डी पोलिसांकडून सुरू आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. यापुढे तालुक्यात गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाईची मोहीम कायम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले.
Tags :

