महाराष्ट्र
09-Dec-2025
अश्लील मेसेज पाठवून महिला अधिकाऱ्याला त्रास पाथर्डीत एकाविरुद्ध गुन्हा दाखल
पाथर्डी- तालुक्यातील एका महिला अधिकाऱ्याला सोशल मीडियावर सलग अश्लील व गैरप्रकारचे संदेश पाठवून त्रास दिल्याच्या आरोपावरून आदिनाथ बाबूराव देवढे (रा. मोहोज देवढे, ता. पाथर्डी) या व्यक्तीविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गैरप्रकारामुळे महिला अधिकारी मानसिक त्रस्त झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला अधिकारी तालुक्यातील एका महत्त्वाच्या विभागात प्रमुख पदावर कार्यरत आहेत. ६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी आदिनाथ देवढे यांनी त्यांच्या मोबाईलवर सतत संदेश पाठवण्यास सुरुवात केली. तुम्ही माझ्या मेसेजला प्रतिसाद का देत नाही? असा प्रश्न
विचारत त्याने महिलेला वारंवार त्रास दिला.
महिला अधिकाऱ्यांनी तुमचा नंबर सेव्ह नसल्यामुळे उत्तर देऊ शकले नाही असे सांगितल्यानंतर आरोपीने अधिक धडधडीत व अश्लील आशयाचे संदेश पाठवण्यास सुरुवात केली.
या प्रकारामुळे व्यथित झालेल्या महिला अधिकाऱ्यांनी तत्काळ पाथर्डी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर आदिनाथ देवढे याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.