महाराष्ट्र
13005
10
अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी
By Admin
अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी
नातेवाइकांचा शेवगाव-तिसगाव रस्त्यावर रास्ता रोको
पाथर्डी : प्रतिनिधी
आदिनाथनगर येथील पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाने बुलेटला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अक्षय अण्णा फुलारी (वय २८, रा. कासार पिंपळगाव) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला संतोष माणिक खवले (वय ३२, रा. सोमठाणे नलवडे) हा गंभीर जखमी झाला. गुरुवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
अक्षय फुलारी व संतोष खवले हे दोघे नातेवाईक वृद्धेश्वर कारखान्यावरून बुलेटवरून कासार पिंपळगाव येथील आपल्या घराकडे जात होते. दरम्यान, आदिनाथनगर येथील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या बुलेटला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात अक्षयचा जागीच मृत्यू झाला, तर संतोष खवले गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताला जबाबदार असलेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेऊन घटनेचा तातडीने तपास करावा, या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी शेवगाव-तिसगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी काही नातेवाइकांनी हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यताही व्यक्त केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन कंडारे यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाइकांच्या भावना जाणून घेतल्या. पोलीस प्रशासनाकडून घटनेचा जलदगतीने तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर नातेवाइकांनी अक्षयचा मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, कासार पिंपळगाव येथे तणावपूर्ण वातावरणात अक्षय फुलारी याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कासार पिंपळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Tags :
13005
10




