महाराष्ट्र
10132
10
ज्ञानेश्वर महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिन
By Admin
ज्ञानेश्वर महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
नेवासा तालुका न्यूज नेटवर्क-
मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई संचलित श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन व भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी १०.३० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तुवर हे होते.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कवडदरा तालुका इगतपुरी येथील प्राचार्य पवार भगवान, जेष्ठ मार्गदर्शक श्री लोहार श्रीराम, श्री परदेशी प्रमोद, श्री भालेराव अमोल, श्री गायकवाड राजेंद्र व श्री सुधीर चव्हाण हे आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
इयत्ता ११ वी व १२ वी च्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात ५० हून अधिक विज्ञान प्रतिकृती सादर केल्या. न्यूटनचे गती विषयक नियम, साध्या यंत्रांचे कार्य, रॉकेट प्रक्षेपणाचे तत्व, मानवी डी.एन.ए. ची रचना, जलशुद्धीकरण प्रकल्प यासारख्या प्रतिकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी केवळ प्रतिकृती न बनवता त्यामागील वैज्ञानिक सिद्धांतही अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक तुवर म्हणाले, "श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या नेवासा नगरीतच ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानाचा दिवा लावला. त्याच भूमीत आज डॉ. कलाम यांच्या विचारातून विज्ञानाचा जागर होणे हा विलक्षण योगायोग आहे. 'वाचाल तर वाचाल' हा केवळ नारा नसून तो जीवन जगण्याचा मंत्र आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी आणि प्रयोगशील बनावे."
या प्रसंगी ग्रंथालय विभागामार्फत डॉ. कलाम यांच्या पुस्तकांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे नियोजन उपप्राचार्य प्रा. हरिचंद्र माने, पर्यवेक्षक प्रा. गोवर्धन रोडे, विज्ञान प्रदर्शन समन्वयक प्रा. रामराव काळे आणि अकॅडमिक चेअरमन प्रा. सुभाष सोनवणे यांनी केले.
यासाठी प्रा. डॉ. कविता जाधव, प्रा. मयूर जामदार, प्रा. किरण कदम, प्रा. सुजय नवले, प्रा. सुकन्या फाटके, प्रा. निलेश कदम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
Tags :
10132
10




