महाराष्ट्र
382
10
दुष्काळी आढावा बैठकीत झोपलेल्या महिला अधिकारी निलंबित
By Admin
दुष्काळी आढावा बैठकीत झोपलेल्या महिला अधिकारी निलंबित
नगर सिटीझन live न्युज नेटवर्क
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदेड, अकोला येथे दुष्काळी आढावा बैठका आयोजित केल्या होत्या. मात्र, या बैठका विविध कारणांमुळे वादात सापडल्या. कुठे मंत्र्यांनी काजू, बदाम व ताव मारला म्हणून, तर कुठे अधिकारी भ्रमणध्वनी पाहत असतानाचे, झोपी गेल्याच्या चित्रफिती समोर आल्यामुळे या बैठका वादात सापडल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर अकोला येथील बैठकीत झोपी गेलेल्या वरिष्ठ भू वैज्ञानिक शिल्पा जनक यांना गुरुवारपासून निलंबित करण्यात आले आहे. शिल्पा अमित जनक या अमरावती येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयात वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा सहाय्यक भूवैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. त्या आढावा बैठकीत झोपी गेल्याची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाल्यामुळे जनक यांना महाराष्ट्र नागरी सेवातील नियम ८६ एकनुसार सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
हा आदेश अस्तित्वात असोपर्यंत त्यांना अमरावती येथील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कार्यालयात थांबावे लागणार आहे. तसेच वरिष्ठ भूजल वैज्ञानिक अमरावती यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, त्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडले तर ते गैरवर्तनात ठरेल आणि वेगळ्या शिस्तभंगाच्या कारवाईसाठी त्या पात्र ठरतील, असेही आदेशात म्हटले आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सूचक संदेश
राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. या या बाबत मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रशासन अत्यंत गंभीर आहे. केंद्र सरकारच्या अटी, शर्ती डावलून मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वात कमी पाऊस पडलेल्या जिल्ह्यात मुख्यमंत्री स्वतः दौरे करत आहेत. दुष्काळाचे अधिसूचनाही लवकरच निघणार आहे. अशा दुष्काळी बैठकीत मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडून केल्या जाणाऱ्या आयोजित केल्या जाणाऱ्या आढावा बैठकीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत सतर्कपणे आणि संवेदनशीलपणे सहभागी होण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचा असंवेदनशीलपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा प्रकारचा एक संदेशच सरकारने प्रशासनाला दिला आहे.
Tags :
382
10




