बिनविरोधच्या बैठकीचा फक्त फार्स
By Admin
बिनविरोधच्या बैठकीचा फक्त फार्स
जिल्हा बँक निवडणूक: सर्कीट हाऊसच्या त्या बैठकीतच थोरात- विखे विरुद्ध शिंदे- लंके यांचे पॅनल
अहिल्यानगर : बँकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे असा मेसेज देण्यासाठी मिडीयाला देखील बोलावणं धाडलं गेलं! सारे रथी महारथी तेथे आले. फोटोसेशन झाले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही एकत्र आलोत हे दाखवले गेले. मात्र, त्याच्याच जोडीने दुसर्या बाजूला विखे- थोरात यांच्या पॅनलचे उमेदवार नक्की होत होते अन् दुसर्या बाजूला शिंदे- लंके यांच्या पॅनलचे उमेदवार ठरवले जात होते. सामान्य जनतेला वेड्यात काढण्यासाठीचा हा सारा फार्स दिसून आला. तीन तासांच्या बैठकीतून काहीही साध्य झाले नाही! अर्थात ते होणारही नव्हते. ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून आजपर्यंत बैठका झाल्या! सुजय विखे पाटील त्यात दिसायचे! जिल्हा बँक निवडणुकीत थोरात- विखे एकत्र आले असल्याचे दिसत असताना काल पहिल्यांदाच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे थोरात यांच्यासोबत दिसले. बैठकीचे छायाचित्र समोर आले! त्यात सभापती राम शिंदे यांना मानाची खुर्ची दिसली.त्यांच्या डाव्या-उजव्या बाजूला थोरात- विखे! जिल्ह्यातील सारे दिग्गज या बैठकीला होते. काथ्याकुट झाला! तरीही निवडणूक बिनविरोध झाली नाही आणि ती होणार नाही हे दोन्ही बाजूच्या नेत्यांना माहिती होतेही! तरीही तो फार्स दाखवला गेला! जिल्ह्यातील जनतेला वेड्यात काढण्याचा प्रयत्न त्यातून झाला! मात्र, जनतेने हे सारे ओळखले होते आणि झालेही तसेच!
पावणेतीन हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे काय?
सामान्य शेतकरी- ठेवीदारांच्या जोडीने छोटे- मोठे दुकानदार यांच्यासाठी जिल्हा बँक विश्वासाची! शेतकरी सोडला तर या बँकेतून अन्य कोणालाही कोणत्याही स्वरुपाचे कर्ज मिळत नाही. शेतकर्याला मिळते ते खरीप अन् रब्बीच्या पिकासाठीचे पिककर्ज! ते देखील मर्यादीत! बँकेकडे १२ हजार कोटींच्या ठेवी असल्याचे सांगितले जाते. या ठेवी कोणत्या कारखानदारांच्या नाहीत! त्या आहेत सामान्य जनतेच्या- शेतकर्यांच्या! कारखानदारांच्या तर नाहीच नाहीत! बँकेत संचालक व्हायला जे निघालेत किंवा याआधी संचालक राहिलेत त्यांच्या या बँकेत ठेवी किती! एक रुपया देखील नाही! या नेत्यांपैकी दोन- तीन जणांचा अपवाद केला तर सर्वांचेच साखर कारखाने आहेत. या कारखान्यांना बँकेने पावणेतीन हजार कोटी रुपयांचे कर्ज दिलेय! यातील एक- दोन अपवाद केले तर सार्यांचे कर्ज थकीत आहे. पैसे सामान्य जनतेचे अन् त्याचा वापर कोण करतोय? कशासाठी करतोय? अनेक प्रश्न आहेत! त्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
जगताप, ससाणे, राजळे बिनविरोध
श्रीरामपूर सेवा संस्था मतदारसंघात एकूण चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात करण जयंतराव ससाणे, सोन्याबापू गोविंद शिंदे, रणजित दिलीपराव बनकर, सोपानराव पुंजाजी राऊत यांचे अर्ज होते. तिघांनी अर्ज माघारी घेतल्याने ससाणे बिनविरोध झाले. पाथर्डी सोसायटी मतदारसंघातून शेटे यांनी माघार घेतल्याने आ. मोनिका राजळे बिनविरोध झाल्या. बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांची बिनविरोध झाले आहेत.
शिंदे- लंके ठरले चर्चेचा विषय!
सभापती राम शिंदे यांना निवडणुकीतून बाहेर ठेवण्यात अनेक घटक सक्रिय होते. तिसर्या अपत्याचा मुद्दा आणि त्यावर निघता- निघता राहिलेला जीआर! त्यातून राम शिंदे यांची झालेली गोची पाहता ते या बैठकीला येणार नाहीत असे वाटत होते. मात्र, त्यांनी देखील बैठकीला हजेरी लावली अन् आपल्या मनात काहीच नाही, असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. खा. लंके यांनीही तेच केले!
खा. निलेश लंके यांनी डाव पलटवला!बैठकीला खासदार निलेश लंके येणार नाहीत अशी अटकळ बांधली गेली होती. खा. लंके हे बैठकीला आले नसते तर त्यांच्याबाबत चुकीचा मेसेज द्यायचा अन् त्यांच्यामुळेच निवडणूक लागली अशी हाकारी पिटवली जाणार होती. मात्र, लंके यांनी तो डाव ओळखला अन् बैठकीला हजेरी लावली. बिनविरोधच्या चर्चेत त्यांनी देखील होकार दिला! मात्र, ही बैठक फक्त आणि फक्त दिखाव्याची असल्याचे ओळखून त्यांनीही तेथून पाय काढला!
राहुल जगताप यांना थेट मुख्यमंत्र्यांचा फोन!
कुकडी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल जगताप यांनी जिल्हा बँक निवडणुकीत त्यांच्यासह त्यांच्या पत्नीचा अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर पाचपुते समर्थकांनी हरकत घेतली होती. त्याचा निर्णय येणे बाकी असतानाच राहुल जगताप यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केला. कुकडी कारखान्याला मदतीचा शब्द त्यांनी दिल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर आज राहुल जगताप यांनी पालकमंत्री विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेच्या आधी त्यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक घेतली. यानंतर जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
पाचपुतेंसमोर दत्ता पानसरे उमेदवार!
आ. विक्रम पाचपुते यांचे बंधू प्रताप पाचपुते यांच्यासाठी राहुल जगताप यांची उमेदवारी अडचणीची होती. त्यामुळेच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून राहुल जगताप यांना थांबवले. मात्र, असे असले तरी माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांची उमेदवारी येथे कायम आहे. पानसरे यांच्याकडे मतांचा मोठा गठ्ठा आहे. याशिवाय पाचपुते- नागवडे यांची युती पसंत नसणारे पानसरे यांच्याकडे जाऊ शकतात. पाचपुते- नागवडे आता संयुक्तपणे काय मोहीम राबवतात यावरच त्यांचे यश अवलंबून असणार आहे.
थोरात- विखे पहिल्यांदा एकत्र!
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री विखे पाटील यांच्यातील वितुष्ट सर्वश्रूत! जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये बैठक झाली. त्या बैठकीबाबत पालकमंत्री विखे पाटील यांनी कानावर हात ठेवले. काल नगरच्या बैठकीत त्यांनी थोरातांच्या सोबत हजेरी लावली. बँकेची निवडणूक हे दोघे एकत्रीतपणे लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हे दोघे बँक निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र आले आहेत.
राम शिंदे यांनी जाहीर केले उमेदवार!
सभापती राम शिंदे यांनी त्यांच्या सोशल मिडिया पेजवर त्यांचे चार उमेदवार जाहीर केले आणि त्यांना निवडून देण्याचे आवाहन देखील केले. जामखेड सोसायटी मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे सचिन घुमरे, कर्जतमधून सौ. ज्योती प्रकाश शिंदे, महिला राखीवमधून सौ. मंजुषा राजेंद्र गुंड, ओबीसीमधून आजीनाथ रामभाऊ हजारे असे चार उमेदवार त्यांनी जाहीर केले.
सीताराम गायकर, चंद्रशेखर घुले यांची माघार!
सलग दहा वर्षे संचालक म्हणून जिल्हा बँकेत प्रतिनिधीत्व केल्याने रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सीताराम गायकर आणि चंद्रशेखर घुले पाटील यांची उमेदवारी अडचणीत आली होती. त्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, आज या दोघांनीही अर्ज मागे घेतले. चंद्रशेखर घुले यांच्या माघारीमुळे आता शेवगाव सोसायटी मतदारसंघातून त्यांच्या पत्नी राजश्री घुले पाटील या बिनविरोध संचालक झाल्या आहेत. या मतदारसंघात या दोघांचेच अर्ज होते. सीताराम गायकर यांनी अकोले सोसायटी मतदारसंघातून माघार घेतली असली तरी त्यांनी त्यांची मुलगी सौ. गोविंद शिंदे यांचा अर्ज कायम ठेवला आहे.
22829
10




