महाराष्ट्र
164
10
विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते
By Admin
विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते ठरणार किंगमेकर
नगर सिटीझन live24 न्यूज नेटवर्क-
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत (Newasa News) एका अभूतपूर्व राजकीय चमत्काराची नांदी पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांसमोर दंड थोपटणारे कट्टर राजकीय विरोधक यंदा एकाच व्यासपीठावर येण्याची चिन्हे असून, ही निवडणूक बिनविरोध पार पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
संपूर्ण हालचालींमागे (Newasa News) ज्येष्ठ नेते, प्रख्यात साहित्यिक आणि माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील यांची संकल्पना असली, तरी पडद्याआडून घडामोडींचे सूत्रे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपल्या हाती घेतली आहेत.
सहकाराचा कणा मानली जाणारी ही बँक कटू राजकीय संघर्षात अडकू नये, यासाठी यशवंतराव गडाख यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय धुरिणांना निवडणूक बिनविरोध करण्याचे जाहीर आवाहन केले होते. त्यांच्या या साकड्याला सकारात्मक प्रतिसाद देत विखे पिता-पुत्रांनी तातडीने राजकीय मुत्सद्देगिरी पणाला लावली.
त्यांनी थेट विरोधी छावणीचे प्रमुख नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याशी पडद्याआड गुप्त संवाद साधत समन्वयाची मजबूत फळी उभारण्यास सुरुवात केली आहे. या अत्यंत नाजूक आणि संवेदनशील राजकीय प्रक्रियेत माजी मंत्री शंकरराव गडाख हे सर्वपक्षीय नेत्यांना एका छताखाली आणण्यासाठी कुशल मध्यस्थाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे पार पाडत आहेत.
अहिल्यानगर जिल्हा बँकेचा इतिहास हा प्रदीर्घ काळापासून विखे विरुद्ध थोरात या पारंपरिक राजकीय संघर्षाने गाजलेला आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांनी अनपेक्षित वळण घेतले आहे. निवडणूक लढवून कटुता वाढवण्यापेक्षा बँक बिनविरोध करण्यातच सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचेही राजकीय हित सामावलेले असल्याचे मानले जात आहे.
जर ही बिनविरोधची (Newasa News) मोहीम यशस्वी ठरली, तर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील या ऐतिहासिक अध्यायाचे संपूर्ण श्रेय यशवंतराव गडाख यांच्या दूरदृष्टीला आणि पडद्यामागून हालचाली करणारे विखे-गडाख यांनाच जाईल. त्यामुळे या निवडणुकीत गडाख आणि विखे हेच खरे 'किंगमेकर' ठरणार असल्याचे स्पष्ट होत असून, राजकीय वैमनस्य बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येण्याचा हा नवा पायंडा संपूर्ण राज्याला नवी दिशा देणारा ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Tags :
164
10




