महाराष्ट्र
1218
10
आज पर्यंत १०९ उमेदवारी अर्ज दाखल; उमेदवारीसाठी इच्छुकांची झुंबड
By Admin
जिल्हा बँक - आज पर्यंत १०९ उमेदवारी अर्ज दाखल; उमेदवारीसाठी इच्छुकांची झुंबड; राजकीय नेत्यांचे अर्ज दाखल, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक
८४६ अर्जांची विक्री
अहिल्यानगर- नगर सिटीन्यूज नेटवर्क
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिग्गज इच्छुकांनी आज, गुरुवारी निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. आजी-माजी आमदार, खासदार, बँकेचे आजी-माजी अध्यक्ष, संचालक अशा अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
आजपर्यंत एकूण ८४६ अर्जांची विक्री झाली असली तरी एकूण १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. संचालक मंडळाच्या २२ जागा आहेत.
उद्या, शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस सुट्टीचे असल्यामुळे आज उमेदवारी दाखल करण्यासाठी राजकीय नेते आपल्या समर्थकांसह निवडणुका कार्यालयात डेरेदाखल झाले होते. काहींच्या समर्थकांनी अर्ज दाखल करतानाच विजयाचा दावा करत जोरदार घोषणाबाजीही केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ एक दिवस बाकी आहे. त्यासाठी सोमवारी अखेरचा दिवस आहे.
खासदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिका राजळे, आमदार किरण लहामटे, आमदार काशिनाथ दाते, यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले, वैभव पिचड, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी त्यांच्या पत्नीसाठी उमेदवारी अर्ज नेला. माजी अध्यक्ष सिताराम गायकर, माजी संचालक करण ससाने, अमोल राळेभात, राजेंद्र नागवडे, अंबादास पिसाळ, अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
‘जिंदाबाद’चा हशा
अजित पवार गटाचे आमदार लहामटे उमेदवारी अर्ज दाखल करून समर्थकांसह निवडणूक कार्यालयातून बाहेर येत असतानाच समोरून शरद पवार गटाचे खासदार लंके समर्थकांसह निवडणूक कार्यालयात आले. दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी अजित पवार जिंदाबाद-शरद पवार जिंदाबादच्या घोषणा सुरू केल्या. नंतर लहामटे व लंके यांनी एकमेकाची गळाभेट घेत शुभेच्छाही दिल्या. लंके यांनी केवळ जिंदाबादच्या घोषणा देऊ नका तर ‘हम तुम्हारे साथ है’ म्हणा असे आवाहन करताच हशा पिकला.
पती-पत्नी, पिता पुत्र
निवडणुकीत पती-पत्नी, पिता-पुत्र, चुलत भाऊ अशांनीही एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये माजी आमदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले व त्यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी माजी संचालक अनुराधा नागवडे, माजी संचालक अंबादास पिसाळ व त्यांचे चिरंजीव तुषार पिसाळ, आमदार प्राजक्त तनपुरे व त्यांचे चुलत बंधू हर्ष तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
संगमनेर, राहाता तालुक्यांची प्रतीक्षा
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या संगमनेर तालुक्यात सर्वाधिक मतदार आहेत, मात्र तेथून अद्याप प्रभावी उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले नाहीत. त्याची प्रतीक्षा आहे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखालील राहाता तालुक्यातूनही अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत. या दोन्ही ठिकाणचे अर्ज आता सोमवारी दाखल होतील. अकोले तालुक्यातील आमदार लहामटे, माजी आमदार पिचड, माजी अध्यक्ष गायकर असे विरोधक एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते.
धावत पळत उमेदवारी अर्ज
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत होती. अनेक इच्छुक अखेरच्या क्षणापर्यंत अर्ज दाखल करीत होते. काही इच्छुक तर अक्षरश: धावत पळत कार्यालयात येताना दिसले. पुढील तीन दिवस सुट्टीचे असल्याचा हा परिणाम असावा. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.
Tags :
1218
10




