२६/११ शहीद हिल मॅरेथॉनचे कवडदरा येथे आयोजन
By Admin
२६/११ शहीद हिल मॅरेथॉनचे कवडदरा येथे आयोजन
यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धावपटूंना प्रवेश शुल्क माफ; महाराष्ट्रातील नामवंत धावपटूंचा सहभाग
नाशिक जिल्हा नगर सिटीन्यूज24
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संत गाडगे महाराज कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित एसजीएम स्पोर्ट्स यांच्या वतीने १६ व्या २६/११ शहीद हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार (दि.२२ नोव्हेंबर ) रोजी करण्यात आले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन यंदा स्पर्धकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा, धुक्याची चादर आणि दारणा धरणाचा निसर्गरम्य परिसर अशा वातावरणात धावपटूंना धावण्याचा अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत धावपटू, भारतीय सैन्य दलातील धावपटू, तसेच डॉक्टर, इंजिनिअर, वकील आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. स्पर्धकांना टी-शर्ट, गुडी बॅग, नाश्ता, ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. यंदाच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक फूड इज इन लिमिटेड कंपनी आहे.स्पर्धेदरम्यान श्री दत्तकृपा मेडिकल व एसएमबीटी हॉस्पिटलच्या सौजन्याने रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच धामणगाव एसएमबीटी हॉस्पिटल, गणपती हॉस्पिटल घोटी, संजीवनी हॉस्पिटल घोटी आणि तन्मय हॉस्पिटल घोटी यांचे सहकार्य लाभणार आहे.यंदाही मॅरेथॉनच्या निमित्ताने आदर्श खेळाडू पुरस्कार, वैद्यकीय सेवा पुरस्कार आणि सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.स्पर्धेचे ठिकाण न्यू इंग्लिश स्कूल, कवडदरा एसएमबीटी हॉस्पिटलजवळ स्पर्धेचा प्रकार पाच किलोमीटर फन रन असा आहे.एसजीएम स्पोर्ट्सचे अध्यक्ष तथा माजी सैनिक भाऊसाहेब बोराडे यांनी महाराष्ट्रातील सर्व क्रीडाप्रेमी व धावपटूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
15318
10




