पाथर्डीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई
पाथर्डी न्यूज नेटवर्क-
पाथर्डी शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाड्या लावून व्यवसाय करणे तसेच वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध पाथर्डी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी अशा दोन दिवसांत एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे रस्त्यांवर अडथळे निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांसह बेशिस्त वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील कोरडगाव रोडवरील नाईक
चौक, जिल्हा परिषद उर्दू शाळा परिसर, नवीन बसस्थानकावरील शेवगाव रोड तसेच कोरडगाव रोडवरील बाजार समितीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली. रस्त्यावर हातगाड्या उभ्या करून चप्पल, फळे आणि कटलरी विक्री केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच काही वाहनधारकांनी रस्त्यावर वाहने अशा पद्धतीने उभी केली होती की, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न
याची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत हातगाडीवर चप्पल विक्री करणाऱ्या दोन, फळविक्री करणाऱ्या चार आणि कटलरी विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चार अॅपे रिक्षा, एक महिंद्रा पिकअप आणि एक महिंद्रा जीतो, अशा सहा वाहनांशी संबंधित व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली. अशा एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणे, वाहतुकीस धोका निर्माण करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचविणाऱ्या कृत्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८५ नुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी नागरे, अल्ताफ शेख, इजाज सय्यद आणि अमोल घुगे यांनी ही कारवाई केली.