महाराष्ट्र
4091
10
जायकवाडीतून सिंचनासाठी २६.४३ टीएमसी मिळणार पाणी; ४.१३
By Admin
जायकवाडीतून सिंचनासाठी २६.४३ टीएमसी मिळणार पाणी; ४.१३ टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात सध्या ५८.६० टीएमसी उपयुक्त जलसाठा आहे. मात्र, ऑगस्ट २०२७ पर्यंत एकूण साठ्याच्या १० टक्के पाणी राखीव ठेवण्याचा शासनाचा निर्णय, वर्षभरात अपेक्षित ९.
७१ टीएमसी बाष्पीभवन आणि माजलगाव धरणासाठी सोडावे लागणारे २.८८ टीएमसी पाणी, यामुळे उपलब्ध उपयुक्त पाण्याचे काटेकोर नियोजन जलसंपदा विभागाने केल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी हंगामासाठी तीन, तर उन्हाळी हंगामासाठी एक अशी चार सिंचन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगाम हातातून गेल्याने जायकवाडी लाभक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संपूर्ण मदार आता रब्बी हंगामावर आहे. त्यामुळे रब्बीसाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती.
मागणीची दखल घेत कालवा सल्लागार समितीने नोव्हेंबरपासून जायकवाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे पहिले सिंचन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला. धरणातील ५८.६० टीएमसी उपयुक्त साठ्यापैकी सुमारे ७.५५ टीएमसी पाणी गाळात गडप झालेले आहे. याशिवाय ९.७१ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन अपेक्षित आहे. माजलगाव धरणासाठी २.८८ टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे. शासन निर्णयानुसार ५.८५ टीएमसी पाण्याचा बफर स्टॉक राखणे आवश्यक आहे.
या सर्व बाबींचा विचार करता सिंचन आणि बिगर सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा सिंचनासाठी २६.४३ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. रब्बी हंगामात डाव्या कालव्याच्या तीन आवर्तनांतून ४२ हजार ९०० हेक्टर, तर उजव्या कालव्याद्वारे १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचा अंदाज आहे. उन्हाळी हंगामातील एका आवर्तनातून आणखी ५ हजार १५० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
४.१३ टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव
छत्रपती संभाजीनगर शहरासह एमआयडीसीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, जालना, अंबड, गेवराई, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, पैठण, बिडकीन आणि चितेगाव इ. शहरांच्या व गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ४.१३ टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे.
उद्योगांसाठी २.१८ टीएमसी
छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहरांतील औद्योगिक वसाहती, परळी औष्णिक विद्युत केंद्र, पैठण एमआयडीसी तसेच संत एकनाथ साखर कारखाना, गंगामाई शुगर इंडस्ट्रीज आणि समर्थ सहकारी साखर कारखाना इ.साठी २.१८ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे.
विविध बंधाऱ्यांसाठी १.७७ टीएमसीची तरतूद
गोदावरी नदीवरील विविध बंधाऱ्यांमधून शेती, गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि पशुधनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या बंधाऱ्यांसाठीही १.७७ टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे.
Tags :
4091
10




