महाराष्ट्र
1190
10
माझ्या यशाचे श्रेय घेऊ नका’; स्वीडनच्या नवनिर्वाचित खासदार नीला विखे
By Admin
माझ्या यशाचे श्रेय घेऊ नका’; स्वीडनच्या नवनिर्वाचित खासदार नीला विखे पाटलांचा काका राधाकृष्ण आणि चुलत भाऊ डॉ. सुजय विखेंना टोला
स्टॉकहोम/अहिल्यानगर न्यूज नेटवर्क
स्वीडनच्या संसदेत (रिक्सडॅग) खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांनी महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. "गेल्या दशकभरापासून आमचा कोणताही कौटुंबिक संपर्क नसताना, माझ्या यशाचे राजकीय भांडवल करून स्वतःची पाठ थोपटून घेणे थांबवावे," अशा शब्दांत त्यांनी कानपिचक्या दिल्या आहेत.
नीला विखे पाटील यांची स्टॉकहोम शहरातून 'ग्रीन पार्टी'तर्फे स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या संसदेत निवड झाली. यानंतर महाराष्ट्रात माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात त्यांनी “महाराष्ट्रात खासदारकी गेली तरी आमच्या घराण्याला स्वीडनमध्ये खासदार मिळाला,” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर नीला यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
१० वर्षांहून अधिक काळ संपर्क नाही:
नीला यांनी स्पष्ट केले की, काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ सुजय यांच्याशी त्यांचे गेल्या १० वर्षांहून अधिक काळ कोणतेही संबंध किंवा बोलणे झालेले नाही. विजयानंतर केवळ शुभेच्छांचा फोन येणे वेगळे आणि त्याचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
विचारसरणीत जमीन-अस्मानाचा फरक:
आपल्या आणि विखे कुटुंबीयांच्या राजकारणात मोठा फरक असल्याचे नमूद करत नीला म्हणाल्या, "माझी आणि त्यांची राजकीय विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. मी ज्या तत्त्वांवर काम करते तिथेच राहीन, मी कधीही माझा पक्ष बदलणार नाही; पण त्यांनी वेळोवेळी पक्ष बदलले आहेत." (राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असा केलेला राजकीय प्रवास त्यांनी अधोरेखित केला.)
नीला विखे पाटलांची पार्श्वभूमी:
नीला या ज्येष्ठ नेते दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असून बालपणातील काही वर्षे त्यांनी लोणी येथे घालवली. त्यानंतर उच्च शिक्षण आणि राजकीय कारकिर्दीसाठी त्या स्वीडनला परतल्या. त्यापूर्वी त्यांनी स्वीडनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
Tags :
1190
10




