पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर काळी जादू करण्याचा धक्कादायक प्रकार
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर काळी जादू करण्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील शरयू नदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा वापर करून करणी किंवा जादूटोणा केला जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी एका अज्ञाताविरोदात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. डेक्क हेराल्डने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
स्मशानभूमीजवळ आढळला फोटो
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोहरीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शरयू नदीच्या काठावर पंतप्रधानांच्या छायाचित्राभोवती नारळ, लिंबू आणि केशरी रंगाची पूड (शेंदूर/गुलाल) यांसारख्या वस्तू मांडून ठेवल्याचं दिसत आहे.
ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. सायबर सेलच्या मदतीने पोलीस सध्या या व्हिडिओच्या स्रोताचा शोध घेत असून घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत.
घोशीचे सर्कल ऑफिसर (सीओ) सत्येंद्र भूषण तिवारी यांनी सांगितलं की, शनिवारी दोहरीघाट पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणाचीही मदत घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. नदीकाठावर पंतप्रधानांचे छायाचित्र आणि जादूटोण्याशी संबंधित या वस्तू कोणी ठेवल्या, तसंच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यामागे काय हेतू होता, याचा शोध पोलीस घेत असल्याचं त्यांनी पुढे नमूद केलं.