महाराष्ट्र
17213
10
पंचायत राज अभियानातून ग्रामविकासाला दिशा : सभापती राम शिंदे
By Admin
पंचायत राज अभियानातून ग्रामविकासाला दिशा : सभापती राम शिंदे
योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून ग्रामविकास साधा :
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
नाशिक विभागस्तरीय पुरस्कार वितरण, कार्यशाळा व सरपंच परिसंवाद उत्साहात संपन्न
अहिल्यानगर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ पुरस्कार मिळविण्यापुरते मर्यादित नसून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे पारदर्शक आणि परिणामाभिमुख अभियान आहे. ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढविण्यासोबतच गावांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या अभियानातून दिशा मिळत आहे. ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गावाच्या विकासाचे नियोजन केल्यास उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर होऊन विकासकामांना गती मिळेल, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६' अंतर्गत 'दुष्काळावर मात आणि समृद्ध गावांचा संकल्प' या विषयावर नाशिक विभागस्तरीय कार्यशाळा, पुरस्कार वितरण सोहळा आणि सरपंच परिसंवाद नेप्ती चौकातील द्वारका लॉन येथे उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात राज्यातील ५ हजार ६४४ गावांनी सहभाग नोंदविला असून अनेक विकासकामे लोकवर्गणीतून पूर्ण झाली आहेत. अभियानांतर्गत ४ हजार १८ ग्रामपंचायतींच्या स्वतःच्या वेबसाइट तयार करण्यात आल्या आहेत, तर ४ हजार ४७ गावांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच ५ हजार १५८ ग्रामपंचायतींनी विविध सोयी-सुविधांची उभारणी केली आहे. गावांमध्ये व्यायामशाळा, शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून ३ लाख ६० हजार घरांची उभारणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी शहरांप्रमाणेच ग्रामीण भागाचाही विकास होणे आवश्यक आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याची गरज असून अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिकाधिक ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील शंभर टक्के ग्रामपंचायतींचा सहभाग अपेक्षित असल्याचे सांगितले. तसेच वनराई बंधारे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी हवामान बदल आणि घटती भूजल पातळी या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावाचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. सरपंच परिसंवादात जलसंधारण, पाणी नियोजन आणि लोकसहभाग या विषयांवर विचारमंथन करण्यात आले.
कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अहिल्यानगर जिल्हास्तरावर ग्रामपंचायत कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) हिने प्रथम क्रमांक पटकावत ५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले. ग्रामपंचायत सौंदाळा (ता. नेवासा) हिने द्वितीय क्रमांक व ३० लाख रुपये, तर ग्रामपंचायत हिवरे बाजार (ता. अहिल्यानगर) हिने तृतीय क्रमांक व २० लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला.
विभागीय पुरस्कारांत रेनवडी व लोणी ग्रामपंचायतींचा गौरव
नाशिक विभागस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत दुगाव (ता. जि. नाशिक) हिने प्रथम क्रमांक व १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविले. ग्रामपंचायत रेनवडी (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हिने द्वितीय क्रमांक व ८० लाख रुपये, तर ग्रामपंचायत लोणी बुद्रुक (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) हिने तृतीय क्रमांक व ६० लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले.
यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, आमदार सुनील कर्जतकर, काशिनाथ दाते, मोनिका राजळे, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, अमोल खताळ, अक्षय कर्डिले, ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व सरपंच उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी हायड्रोपोनिक चारा निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. विश्वनाथ कोरडे यांनी जलतारा जलसंधारण कामासाठी वैयक्तिक पाच लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल त्यांचे मान्यवरांनी कौतुक केले.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अभियानाचे सादरीकरण केले, तर सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आभार मानले.
Tags :
17213
10




