महाराष्ट्र
21586
10
शॉर्टसर्किटमुळे दोनशे एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे नुकसान
By Admin
शॉर्टसर्किटमुळे दोनशे एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे नुकसान
नगर सिटीन्यूज नेटवर्क शेवगाव तालुका
शॉर्टसर्किटमुळे उसाच्या
शेताला भीषण आग लागून तोडणीला आलेला दोनशे एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना शेवगाव तालुक्यातील शहापूर येथे आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांवर आगीच्या संकटाने दुहेरी घाव घातला आहे.
मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान आत्माराम आहेर यांच्या गट नंबर ४१/२ ब मधील शेतातील टान्सफार्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागून आत्माराम आहेर यांच्या उसाच्या शेताबरोबर शेजारील शेतकरी लक्ष्मीकांत अण्णासाहेब आहेर, भरत एकनाथ आहेर, भीमराज काकडे, आदिनाथ सोंडे, बापू सोंडे, शिवराज आहेर, महेश आहेर, शेषराव आहेर, बबन आहेर,
शिवाजी आहेर, ऋषिकेश आहेर, योगेश आहेर, अंकुश आहेर, सुरेश आहेर, चंद्रकांत आहेर, आबासाहेब आहेर, आमोल आहेर या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आग लागली त्यावेळी वारा असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. अवघ्या एका तासातच दीड किलोमीटरपर्यंत उसाचे पीक जळून पूर्णपणे
खाक होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
यावर्षी दुष्काळाच्या झळा, त्यात आगीचा वणवा पेटला. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असताना पिके जगवण्यासाठी केलेला खर्च, पाण्याची टंचाई आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी
हतबल झाला आहे. अशातच शहापूर येथे लागलेल्या आगीने उभ्या उसाच्या पिकाची राखरांगोळी केली. वर्षभर काबाडकष्ट पिकासाठी मोठा खर्च करून उत्पन्नाची आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर या आगीने अक्षरक्षः पाणी फेरले आहे. आता झालेला खर्च कसा भरून काढायचा आणि कर्जाची परतफेड कशी
करायची, असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. जळीत झालेल्या उसाचा महसूल, कृषी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी. घटनास्थळाची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत, आगीचे नेमके कारण निश्चित करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
दुष्काळ आणि आगीच्या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता के वळ आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. ज्ञानेश्वर व वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते, परंतु आग मोठ्या प्रमाणात पसरली असल्यामुळे ती विझविणे शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह अग्निशामक दलाच्या जवानांना डोळ्यादेखत ऊस जळताना पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
Tags :
21586
10




