महाराष्ट्र
29830
10
दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या
By Admin
दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या
मोक्कातील फरार आरोपीचा समावेश; २ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघे पसार
अहिल्यानगर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने पाठलाग करून जेरबंद केले. ही कारवाई कर्जत तालुक्यातील राशीन ते चिलवडी रस्त्यावरील पिराच्या माळावर करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींमध्ये मोक्का कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीचा समावेश आहे. तर अन्य तिघे पोलिसांना चकवा देऊन पसार झाले.
जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दरोडाप्रतिबंधक पेट्रोलिंगचे आदेश दिले होते. त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी एलसीबीचे पथक कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, राशीन ते चिलवडी रस्त्यावर काही जण मोटारसायकलवरून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिराच्या माळावर सापळा रचला. संशयित मोटारसायकलवरून येताना दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, आरोपी मोटारसायकली सोडून पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले, तर अन्य तिघे पसार झाले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये बाक्या बंड्या काळे व गोट्या बंडू काळे (दोघे रा. आखोणी, ता. कर्जत) तसेच धोंड्या ईश्वर भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत) यांचा समावेश आहे. पसार झालेल्या आरोपींची नावे शुभम गहिनीनाथ भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत), रोहित नितीन चव्हाण व सुमित नितीन चव्हाण (दोघे रा. केडगाव, ता. अहिल्यानगर) अशी आहेत.
या कारवाईत पोलिसांनी तीन मोटारसायकली, तीन मोबाईल, एक कटावणी, एक पान्हा, मिरची पूड, एक कोयता व एक स्क्रू ड्रायव्हर असा एकूण २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, अटकेतील धोंड्या ईश्वर भोसले हा पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कायद्यांतर्गत फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीच्या पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या नेतृत्वाखाली अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, भीमराज खर्स, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, दीपक जाधव व जालिंदर साखरे यांच्या पथकाला पेट्रोलिंगसाठी पाठवले होते. या पथकाने ही धडक कारवाई केली.
Tags :
29830
10




