महाराष्ट्र
19048
10
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी जात असताना एका प्राध्यापकाचा
By Admin
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी जात असताना एका प्राध्यापकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू
नगर सिटीन्यूज नेटवर्क-
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी जात असताना एका प्राध्यापकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात घडली आहे. या घटनेनंतर मृत प्राध्यापकाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलेल्या तीन शिक्षकांच्या वाहनालाही परत येताना अपघात झाला. या दुहेरी घटनेमुळे शिक्षकवर्गात शोककळा पसरली आहे.
मृत प्राध्यापकाचे नाव आबासाहेब हिम्मतराव शिरसाठ (वय 48) असे आहे. ते नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील श्री साई शिक्षण संस्था संचालित कै. वा. सो. पगार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत होते.
#प्रशिक्षणासाठी जात असताना काळाचा घाला
मिळालेल्या वृत्तानुसार, प्रा. आबासाहेब शिरसाठ हे साकोरा येथे सुरू असलेल्या वरिष्ठ निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी मागील सात दिवसांपासून नियमित उपस्थित राहत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रशिक्षणासाठी जात असताना तळवाडे गावाजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
त्यांच्यासोबत असलेल्या शिक्षक सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना तातडीने चारचाकी वाहनातून मालेगाव येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
#सहकाऱ्यांना मदत करताना तीन शिक्षक जखमी
एका सहकाऱ्याला वाचविण्यासाठी धावपळ करणाऱ्या शिक्षकांवरही दुर्दैवाने संकट कोसळले. प्रा. शिरसाठ यांना उपचारासाठी मालेगाव येथे घेऊन गेलेल्या त्याच वाहनातून परत येत असताना जाटपाडे शिवारात अपघात झाला.
या अपघातात अमोल गंगेले (वय 44), नितीन अहिरे (वय 38) आणि तुषार मेतकर (वय 38) हे तीन शिक्षक जखमी झाले. त्यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
प्रा. आबासाहेब शिरसाठ यांच्या आकस्मिक निधनाने आमोदे परिसरासह साकोरा येथील प्रशिक्षणार्थी शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच आई-वडील असा परिवार आहे.
एकीकडे सहकाऱ्याच्या निधनाचे दुःख आणि दुसरीकडे त्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांच्या वाहनाचा अपघात, अशा दोन घटनांनी संपूर्ण शिक्षकवर्गाला मोठा धक्का बसला आहे.
शिक्षकवर्गात हळहळ
शिक्षकांच्या सेवाविषयक प्रशिक्षणाच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने शिक्षकांच्या मनात हळहळ व्यक्त होत आहे. प्रा. शिरसाठ यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जखमी शिक्षक लवकर बरे व्हावेत, अशी भावना व्यक्त होत आहे.
Tags :
19048
10




