महाराष्ट्र
7355
10
ऊसाला ४ हजार रुपये दर द्या, अन्यथा कारखान्यांचे काटे बंद पाडू!
By Admin
ऊसाला ४ हजार रुपये दर द्या, अन्यथा कारखान्यांचे काटे बंद पाडू!
शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा साखर कारखानदारांना इशारा
हजारो शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
नगर सिटीन्युज24 live टिम प्रतिनिधी
अहिल्यानगर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन चार हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी, अन्यथा कारखान्यांचे काटे बंद पाडू, असा स्पष्ट इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. या मोर्चात शिवसेना शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने उसाला चार हजार रुपयांच्या आसपास दर देऊ शकतात, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांना हा दर का देत नाहीत? यंदाच्या गळीत हंगामात अनेक कारखान्यांनी केवळ ३,१०० ते ३,२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे, तर काही कारखान्यांनी दर जाहीर न करताच गाळप सुरू केले आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना खते, मजुरी, ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. उत्पादन खर्चाचा विचार करता कारखानदारांकडून जाहीर करण्यात येणारा दर परवडणारा नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. साखर, इथेनॉल आणि बगॅस यांसारख्या उपपदार्थांतून कारखान्यांना मोठे उत्पन्न मिळत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
सत्ताधारी असो किंवा विरोधक, साखर कारखानदारांच्या बाबतीत सर्व पक्षांतील नेते एकत्र येतात; मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपेक्षित भूमिका घेतली जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये पहिली उचल जाहीर केल्याशिवाय ऊसतोडणी करू देऊ नये. ज्या कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केलेला नाही, त्यांनी तातडीने दर जाहीर करावा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. मागणी मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस वाहतूक रोखण्यासह कारखान्यांचे काटे बंद पाडण्याचे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
Tags :
7355
10




