कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीला जिल्ह्यात प्रथम क्रमांकासह ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाल्याबद्दल सरपंच मोनालीताई राजळे पुष्पगुच्छ देऊन सन्मान
पाथर्डी - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीने अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत ५० लाख रुपयांचे बक्षीस पटकावल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी रात्री फटाके फोडून जल्लोष केला.
यावेळी पञकार अमोलराजे म्हस्के, शरद म्हस्के, विशाल चितळे सर, नंदू म्हस्के व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावात झालेली ग्राम पंचायत अंतर्गत विकास कामे यामध्ये रस्ते,पाणी,नागरिकांच्या विविध सोयी सुविधा,घरकुल योजना,ग्रामस्थांचा विविध उपक्रमातील सहभाग,गावातील शाळा महाविद्यालय,कृषी अंतर्गत कच्च्या मालावर आधारित उद्योग समुह,महिला बचत गट,आरोग्य सुविधा,
स्वच्छता, वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि विविध विकासकामांना चालना मिळाली. विशेषतः वृक्षलागवड व स्वच्छता या उपक्रमांना मिळालेले गुण गावाच्या प्रथम क्रमांकाच्या यशात महत्त्वपूर्ण ठरले. या अभियानात गावातील तरुणांनी घेतलेला सक्रिय पुढाकार आणि ग्रामस्थांनी दिलेले सहकार्य यामुळे अभियानाला मोठे बळ मिळाले.
यावेळी बोलताना मा.सरपंच मोनालीताई राजळे म्हणाले की, “या अभियानात गावातील तरुण, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकजुटीने काम केले. त्यामुळेच कासार पिंपळगावला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवता आला. हा एकीचा विजय आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे किती महत्त्वाचे आहे, हे या यशातून सिद्ध झाले आहे.”असेच काम यापुढेही आपल्या सर्वाना करायचे आहे.
या पुरस्कारामुळे कासार पिंपळगावच्या विकासकामांना नवी प्रेरणा मिळाली असून गावातील तरुणांचा उत्साह, ग्रामस्थांची एकजूट यामुळे हा पुरस्कार आपल्या गावाला मिळाला आहे.यावेळी गावातील अनेक सामाजिक विषयावर सकारात्मक चर्चा झाली.