महाराष्ट्र
6955
10
हनुमान टाकळी–कोपरे रस्त्याची दुरवस्था बनली जीवघेणी!
By Admin
हनुमान टाकळी–कोपरे रस्त्याची दुरवस्था बनली जीवघेणी!
ऊसाची टायरगाडी पलटी होऊन अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांमध्ये संताप
पाथर्डी तालुका न्युज नेटवर्क
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी ते कोपरे या महत्त्वाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावरील खड्डे आणि असमतोलामुळे वाहनधारकांसह शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. नुकतेच या रस्त्यावर उसाने भरलेली टायरगाडी पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र बैलांना किरकोळ दुखापत झाली असून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
पाईपलाईनच्या कामानंतर रस्त्याची चाळण झाली आहे.या परिसरात नवीन रस्त्याचे काम झाल्यानंतर पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेला भाग व्यवस्थित पूर्ववत न केल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
या रस्त्यावरून खासगी पाणीटँकर, ऊस वाहतूक करणाऱ्या टायरगाड्या तसेच इतर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. रस्त्याची दुरवस्था आणि अवजड वाहतूक यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत.
शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे, धूळ आणि असमतोलामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
मोठ्या अपघाताची प्रशासन वाट पाहत आहे का? असे ग्रामस्थांना वाटते.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.
हनुमान टाकळी ते कोपरे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, पाईपलाईनसाठी खोदलेला भाग व्यवस्थित बुजवावा आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर आवश्यक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
Tags :
6955
10




