महाराष्ट्र
1846
10
शेवगाव-पाथर्डी तालुका टंचाई आढावा बैठक;शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा.-ना.विखे
By Admin
शेवगाव-पाथर्डी तालुका टंचाई आढावा बैठक;शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा.-ना.विखे
शेवगाव न्यूज नेटवर्क
शेवगाव–पाथर्डी मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज दि.२ आॕक्टोबर रोजी शेवगाव येथे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत टंचाई आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पाणीटंचाई, कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, पिण्याच्या पाण्याचे नियोजन तसेच पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांबाबत मी प्रशासनासमोर मतदारसंघातील प्रश्न मांडले. शेवगाव–पाथर्डीकरांना हक्काचे पाणी मिळावे आणि दुष्काळी परिस्थितीत नागरिक, शेतकरी व पशुधनाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी केली. ताजनापूर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करण्यासोबतच प्रलंबित पाणीपुरवठा योजनांना वेग देण्याची गरजही यावेळी व्यक्त केली.
पालकमंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे तातडीने करण्यात यावेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. पाणीटंचाईच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याबरोबरच पशुधनाच्या रक्षणासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. राज्य सरकार शेतकरी आणि पशुधनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून दुष्काळी परिस्थितीत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांचा त्यामध्ये समावेश आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये शासनाच्या विविध सवलती व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. ताजनापूर टप्पा १ व टप्पा २ नंतर टप्पा ३ चे काम प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामाला आवश्यक ती गती मिळावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच ताजनापूर टप्पा-१ योजनेअंतर्गत आखेगावसह १३ गावांना योजनेचा लाभ मिळावा, याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील दुष्काळग्रस्त आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांचा संबंधित पाणीपुरवठा योजनांमध्ये आवश्यकतेनुसार समावेश करण्यासंदर्भात चर्चा झाली.
शेवगाव–पाथर्डी मतदारसंघातील नागरिक, शेतकरी आणि पशुधनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीत आवश्यक तो दिलासा मिळवून देण्यासाठी माझा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील.
याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद भंडारी, प्रांत अधिकारी, शेवगाव व पाथर्डी तालुक्याचे तहसीलदार, शेवगाव व पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Tags :
1846
10




