महाराष्ट्र
20284
10
पाथर्डीतील चोऱ्यांचे सत्र थांबेना! शहरासह ग्रामीण भागातही चोरट्यांचा
By Admin
पाथर्डीतील चोऱ्यांचे सत्र थांबेना! शहरासह ग्रामीण भागातही चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुचाकी लंपास
पाथर्डी : शहरातील चोरीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आनंदनगर परिसरात एकाच रात्री दोन मोटारसायकली चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोग्यदीप हॉस्पिटलच्या पाठीमागील इमारतीच्या पार्किंगमध्ये लॉक करून उभ्या केलेल्या दोन्ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या घटनेत तब्बल ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून, शहरातील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आनंदनगरमध्ये एकाच रात्री दोन दुचाकी गायब
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार राजेंद्र नारायणराव देवढे (वय ५९, मूळ रा. मोहोज देवढे, ता. पाथर्डी, सध्या रा. आनंदनगर, पाथर्डी) यांची होंडा हॉर्नेट मोटारसायकल (क्रमांक एमएच १६ बीएस ३४१३) चोरीला गेली आहे. या मोटारसायकलीची किंमत ३० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्याच इमारतीत राहणारे आकाश सुभाष नाडे यांची होंडा शाइन मोटारसायकल (क्रमांक एमएच २८ बीएल ७७०८) देखील चोरीला गेली. या दुचाकीची किंमत ३५ हजार रुपये आहे.
१९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी देवढे यांनी आपली मोटारसायकल इमारतीच्या पार्किंगमध्ये लॉक करून उभी केली होती. रात्री आठच्या सुमारास आकाश नाडे यांनीही आपली मोटारसायकल त्याच ठिकाणी पार्क केली. मात्र, २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नाडे यांना आपली दुचाकी जागेवर दिसली नाही. त्यांनी शोध घेतला असता देवढे यांची मोटारसायकलही गायब असल्याचे समोर आले.
दोघांनी परिसरात तसेच संभाव्य ठिकाणी वाहनांचा शोध घेतला; मात्र दोन्ही मोटारसायकली मिळून आल्या नाहीत. अखेर अज्ञात व्यक्तींनी वाहने चोरून नेल्याचा संशय व्यक्त करत तक्रार देण्यात आली.
पाथर्डी शहर आणि परिसरातील चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. निवासी इमारतींच्या पार्किंगमधून एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला जाणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सतर्कता आवश्यक असून, अशा घटनांना आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकलींचा शोध घेऊन चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहनधारकांनी दुचाकींना मजबूत लॉक लावावे, शक्यतो सीसीटीव्ही असलेल्या सुरक्षित ठिकाणी वाहने पार्क करावीत आणि परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना तातडीने कळवावे.
६५ हजारांच्या चोरीचा तपास करून दुचाकी परत मिळवून देण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
Tags :
20284
10




