महाराष्ट्र
20579
10
जन्मदात्या पित्याने स्वतःची किडनी दान करून मुलीला दिले जीवनदान!
By Admin
जन्मदात्या पित्याने स्वतःची किडनी दान करून मुलीला दिले जीवनदान!
चंद्रकांत पाचरणे यांचे दहावीच्या विद्यार्थ्यांना अवयवदानाबाबत अनमोल मार्गदर्शन
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठान संचालित न्यू इंग्लिश स्कूल, आदिनाथनगर येथे इयत्ता दहावीच्या विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील ‘अवयवदान’ या घटकाच्या अनुषंगाने विद्यालयातील शिक्षकेतर सेवक श्री. चंद्रकांत पाचरणे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले.विशेष म्हणजे, श्री. पाचरणे यांनी स्वतःची एक किडनी आपल्या मुलीला दान करून तिला नवजीवन दिले आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी वडील आणि मुलगी या दोघांवरही यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली असून सध्या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.विद्यार्थ्यांना अवयवदानाविषयी केवळ पुस्तकी माहिती न मिळता प्रत्यक्ष अनुभवातून या विषयाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने विज्ञान शिक्षक श्री. अरुण कराळे यांनी पाचरणे यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची विनंती केली. त्यांनीही आनंदाने या उपक्रमात सहभाग घेतला.यावेळी जवळपास ४० मिनिटांच्या संवादातून त्यांनी स्वतःच्या मुलीला किडनी दान करण्याचा घेतलेला निर्णय, त्यावेळचे अनुभव, कुटुंबाची भूमिका, वैद्यकीय तपासण्या, आवश्यक परवानग्या, कायदेशीर प्रक्रिया, डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच प्रत्यारोपणापूर्वी व प्रत्यारोपणानंतर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली.अवयवदान म्हणजे माणुसकी, प्रेम, त्याग आणि नात्यांमधील विश्वासाचे जिवंत उदाहरण आहे, हे त्यांच्या अनुभवकथनातून विद्यार्थ्यांना प्रकर्षाने जाणवले. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे दुसऱ्या व्यक्तीला नवजीवन मिळू शकते, हा मोलाचा सामाजिक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला.त्यांची ओघवती भाषा, सहजसुंदर संवादशैली आणि प्रत्यक्ष अनुभवातून विषय समजावून सांगण्याची हातोटी यामुळे विद्यार्थी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. पुस्तकातील धडा आणि प्रत्यक्ष जीवनातील अनुभव यांची सांगड घालणारे हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील अवयवदानाविषयीच्या अनेक शंकांचे निरसन झाले. अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासही मदत झाली.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांतर्फे ज्ञानेश्वर माने या विद्यार्थ्याने श्री. चंद्रकांत पाचरणे यांचे मनःपूर्वक आभार मानले. स्वतःची किडनी दान करून मुलीला जीवनदान देणाऱ्या त्यांच्या त्यागभावनेचे विद्यार्थ्यांनी विशेष कौतुक केले. पाचरणे पिता-कन्येला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मुख्याध्यापक अशोक काळे सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री. पाचरणे यांच्या महान कार्याचे कौतुक केले.
'अवयवदान हे केवळ दान नाही, तर दुसऱ्याला नवजीवन देण्याचे महान कार्य आहे!' हा अनमोल संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनावर कोरला गेला.
Tags :
20579
10




