महाराष्ट्र
723
10
वृद्धेश्वर कारखान्याच्या बदनामीचे आरोप सहन करणार नाही.
By Admin
वृद्धेश्वर कारखान्याच्या बदनामीचे आरोप सहन करणार नाही.- आमदार मोनिका राजळे यांचा इशारा
पाथर्डी- प्रतिनिधी
वृद्धेश्वर कारखान्याचा वजन काटा सदोष आहे. असा वारंवार खोटा प्रचार करून संचालक मंडळाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. ज्याला शंका असेल त्यांनी वजन काट्या पुढे एक वेळ उभे राहून खात्री करावी. शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे पाप आम्ही करणार नाही.
कारखान्याची बदनामी व वारंवार तेच तेच खोटे आरोप आम्ही सुद्धा सहन करणार नाही, अशा शब्दात वृद्धेश्वर कारखान्याच्या संचालक तथा आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांना स्पष्टपणे सुनावले.
कारखान्याची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला सर्व संचालक, कारखान्याच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गर्जे, सामाजिक कार्यकर्ते बबन बांगर अशा निवडक कार्यकर्त्यांनी सभेचे कामकाज सुरू असताना विविध मुद्द्यांना पुढे करत संचालक मंडळाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जाहीर रित्या वजन काट्याचा विषयावरून संचालक मंडळाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाल्याने आमदार मोनिका राजळे यांनी अत्यंत कडक शब्दात उत्तर देत आक्रमक पवित्रा घेतला.
विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्यानंतर ऐनवेळेच्या विषयांमध्ये बोलताना शिवशंकर राजळे यांनी कारखान्यावर असलेले कर्ज, एकूण तोटा, सभासद वारसांच्या नोंदी, सभासदांसाठीच्या साखरेच्या किमतीत अचानक केलेली दरवाढ या मुद्द्यांबरोबरच आगामी गाळप हंगामाचा दर जाहीर करण्याची मागणी केली.
वृद्धेश्वर कारखाना ऊसतोड वेळेवर करीत नाही. कारखान्याच्या वजन काट्यावर लोकांचा विश्वास नाही असा आरोप केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गर्जे यांनी उसाला यावर्षी किमान पाच हजार रुपये भाव द्यावा, सभासद वारस प्रमाणपत्र, सभासदांसाठीच्या साखरेची चुकीच्या पद्धतीने केलेली दरवाढ रद्द करून सभासदांना नियमानुसार 31 रुपये प्रति किलो दरानेच साखर मिळावी अशी मागणी करत सभासदांनी वृद्धेश्वरलाच ऊस द्या, टिपूर सुद्धा बाहेर जाऊ देऊ नये असे नियोजन संचालक मंडळाने करावे मागील हंगामाचे उर्वरित पेमेंट 270 रुपये प्रति टनाप्रमाणे व्हावी अशी मागणी केली.
यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या, पाट पाण्याच्या तालुक्याचा भाग सोडला तर पाण्याची गंभीर परिस्थिती आहे. सध्या चाऱ्यासाठी उसाची तोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शासनाच्या सर्वेक्षणानुसार दोन महिने पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. दुष्काळामुळे तालुक्याचे अर्थचक्र बिघडले. यंदा उसाची पळवा पळवी वाढणार आहे. कारखाना व्यवस्थित चालून शेतकऱ्यांना लाभ व्हावा, कामगार, मजुरांचे प्रपंच सुरळीत चालावेत, अशी संचालक मंडळाला तळमळ असून तशा दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी बाहेरच्या कारखान्यांना ऊस दिला त्या शेतकऱ्यांचे पेमेंट वेळेवर मिळाले नाही. काहींचे अजूनही पैसे अडकून पडले आहेत. यंदाच्या हंगामासाठी संचालक मंडळाकडून ऊस उत्पादकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. वृद्धेश्वर ने एफ आर पी पेक्षा कधीही भाव कमी दिलेला नाही. गावगाडा सांभाळताना वित्तीय संस्था, बँका, कामगार, तोडणी मजूर, कर्ज हप्त्यांची परतफेड व व्याज अशा सर्व गोष्टींचा ताळमेळ घालत शासन निर्णयाच्या आदेशाचे पालन करत ऊस दराबाबतचा निर्णय होतो. उसाच्या बाबतीत वृद्धेश्वर कारखान्याला सहकार्य करावे. आपला कारखाना आपल्या भागाचे वैभव आहे. तो टिकला पाहिजे, तो चालला पाहिजे, अशी भावना ऊस उत्पादकांनी मनात बाळगावी. हंगामा पुढील अडचणी पाहता सर्वांनीच संयम बाळगावा. कारखान्याचे व आपले भावनिक नाते असून आतापर्यंत ऊस उत्पादकांच्या अडीअडचणींना कारखाना धावून आलेला आहे. कोणत्याही आमिषाला उत्पादकांनी बळी पडू नका. शेजारच्या कारखान्यांच्या तोडीस तोड आपण भाव देऊ, असे राजळे म्हणाल्या.
ज्येष्ठ संचालक सुभाष ताठे यांनी स्वागत केले. संभाजी राजळे यांनी नफा तोटा पत्रक व ताळेबंद सादर केला. रवींद्र महाजन यांनी अहवाल वाचन केले, तर श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले.
Tags :
723
10




