पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट प्लॉट विक्रीचे पैसे घेऊन जात असताना दुचाकीस्वार चोरट्यांचा हल्ला;येळाई जखमी
पाथर्डी- प्लॉट विक्रीतून मिळालेले नऊ लाख रुपये घेऊन घरी जात असलेल्या दीपक येळाई यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी हल्ला करून त्यांच्याकडील नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केली.ही घटना गुरुवारी दिवसाढवळ्या पाथर्डी शहरातील पेठ परिसरात नवरंग कापड दुकानासमोर घडली. या झटापटीत येळाई जखमी झाले आहेत.
दीपक येळाई हे प्लॉट विक्रीतून मिळालेले नऊ लाख रुपये घेऊन घरी जात होते.ते पेठेतील नवरंग कापड दुकानासमोर आले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत येळाई यांना दुखापत झाली. चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील नऊ लाख रुपयांची रोकड हिसकावून दुचाकीवरून पोबारा केला.
दरम्यान, पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांनी आजच पाथर्डी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच शहरात दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट झाल्याने पोलिसांसमोर अज्ञात चोरट्यांना शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून,चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.घटनेनंतर येळाई यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचार करण्यात आले.यावेळी आमदार मोनिका राजळे,उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू,पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांनी भेट घेत येळाई यांची विचारपूस केली.