उसाचा ट्रक उलटला; २२ टन उसाचे नुकसान
नगर सिटीझन न्यूज नेटवर्क
पैठणहून विघ्नहर साखर कारखाना, जुन्नर येथे सुमारे २२ टन ऊस घेऊन जाणाऱ्या उसाच्या ट्रकला करंजी घाटात समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री घडला. अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असला तरी ट्रकचे
आणि ट्रकमधील उसाचे मोठे नुकसान झाले आहे.
शेवगाव - पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाची ट्रकच्या सहाय्याने पुणे जिल्ह्याकडे वाहतूक केली जात असून, गेल्या आठ पंधरा दिवसांपासून पैठण परिसरातून शेवगाव करंजी घाट मार्गे प्रवास करून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील
कारखान्यांना ऊस पोहोच केला जात आहे. पैठण ते जुन्नर सुमारे अडीचशे किलोमीटर अंतर असून, यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली उसाची कमतरता लक्षात घेता, पुणे जिल्ह्यातील कारखानदारदेखील पैठण व शेवगाव तालुक्यातून ऊस नेत आहेत. शनिवारी मध्यरात्री पैठणहून विघ्नहर साखर कारखाना, जुन्नर येथे सुमारे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रकला करंजी घाटात समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला.
करंजी घाटातून ऊस वाहतूक करताना ट्रक चालकांची मोठी कसरत होत असून, अनेक छोटे-मोठे वाहने या जड वाहनांना हुलकावणी देऊन अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रक घाटातील रस्त्यावरच बंद पडलेले दिसून येतात. शनिवारी मध्यरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघातामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, दुपारनंतर हा ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला.